गणेशोत्सवाआधी सातारा पोलिसांचा ‘प्रतिबंधक’ धडाका; २०१ सराईतांवर कारवाई

हद्दपारीपासून नोटिसांपर्यंत विविध कारवाया; उत्सव काळात उपद्रव करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

by Team Satara Today | published on : 22 September 2026


सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातारा पोलिसांनी सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल २०१ सराईत व्यक्तींविरुद्ध विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली असून, हद्दपारीपासून प्रस्ताव, नोटिसा आणि इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा त्यात समावेश आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात शांतता भंग करणाऱ्या प्रवृत्तींवर पोलिसांनी आधीच लगाम घालण्यास सुरुवात केली आहे.
गणेशोत्सवाच्या कालावधीत शहरात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका, विविध धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच पूर्वी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईवर भर दिला आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी ही मोहीम राबविली.
महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम ५५ अंतर्गत सात जणांच्या टोळ्यांवर सहा महिन्यांसाठी, तर कलम ५६ अंतर्गत एका व्यक्तीवर तीन महिन्यांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय कलम ५५ अंतर्गत एक, कलम ५६ अंतर्गत दोन आणि कलम ५७ अंतर्गत एक प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कलम १६३(२) अंतर्गत २०१ प्रस्ताव, कलम १२२ अंतर्गत १४ कारवाया, कलम १२६ अंतर्गत ६१ प्रस्ताव, कलम १२९ अंतर्गत आठ प्रस्ताव, तर कलम १६८ अंतर्गत तब्बल ७४१ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका आणि सार्वजनिक ठिकाणी विनाकारण थांबणे, वावरणे अथवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्यास कारणीभूत ठरू शकणाऱ्या हालचालींवरही पोलिसांची नजर आहे. २१ सप्टेंबरच्या आदेशानुसार संबंधित व्यक्तींना २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.०१ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत संबंधित हद्दीतून बाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. उत्सवाच्या काळात संवेदनशील भागांमध्ये पोलिस बंदोबस्त वाढविण्यासह सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातात एकाच्या मृत्यूप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा
पुढील बातमी
सातारा जिल्हा परिषदेत पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची सांगता; अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांनी वाजवला ढोल

संबंधित बातम्या