लिंब फाट्याच्या उड्डाणपुलावर दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक; आनेवाडीच्या २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू

by Team Satara Today | published on : 22 September 2026


आनेवाडी : पुणे-बंगळूर महामार्गावरील लिंब फाटा येथील उड्डाणपुलावर आज सायंकाळी दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. या अपघातात आनेवाडी (ता. सातारा) येथील युवक प्रशांत बाबासाहेब फरांदे (वय २९) हा दुचाकीस्‍वार ठार झाला.
प्रशांत फरांदे हे आज सायंकाळी चारच्‍या सुमारास साताऱ्याहून आनेवाडीकडे निघाले होते. ते दुचाकी (एमएच ११ डीएस ८३३०) वरून प्रवास करत लिंब फाटा येथील उड्डाणपुलावर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसली. या अपघातात प्रशांत फरांदे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत फरांदे हे पुणे येथील अग्निशमन दलात कार्यरत होते. अशा तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी समजताच आनेवाडी गावासह कुटुंबीय, नातेवाईक व मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
पुणे-बंगळूर महामार्गावर सातारा परिसरात सातत्याने अपघातांच्या घटना घडत आहेत. त्‍यामुळे संबंधित यंत्रणांनी अपघातप्रवण ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक, तसेच पुरेशा प्रकाश योजनेसह वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याच्‍या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्‍यक्‍त होत आहेत. घटनेची माहिती मिळताच, सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. अपघात नेमका कशामुळे झाला आणि अज्ञात वाहन कोणते होते, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विधानपरिषदेच्या पदवीधर-शिक्षक मतदारसंघांच्या ५ जागांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान; २७ ऑक्टोबरला मतमोजणी

संबंधित बातम्या