सातारा : सेवा संकल्प अभियान १७ सप्टेंबर २०२६ ते दि. १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सातारा यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा मानस आहे.
सर्व मागासवर्गीय (अनुसुचित जाती (SC), भटक्या जमाती (NT B,C,D), विमुक्त जाती (VJ-A), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासप्रवर्ग (SBC) व सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) प्रवर्गातील पालकांनी आपल्या पाल्याचे जात वैधता प्रमाणपत्र त्यांच्या इयत्ता ११ वी / १२ वी विज्ञान अभ्यासक्रम व पदविका (तृतीय वर्ष अभ्यासक्रमात) शिकत असताना प्राप्त करण्याकामी योग्य कागदपत्रांसह परिपुर्ण प्रस्ताव तयार करून आपल्या विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्फत समितीस जास्तीत जास्त संख्येत सादर करावेत.
तसेच (उपरोक्त नमुद प्रवर्गातील) ज्या विद्यार्थ्यांनी यापुर्वी समितीस प्रस्ताव सादर केले आहेत परंतु अद्याप त्रुटींची पुर्तता केली नसल्याने त्यांचे प्रकरण प्रलंबित आहे अशा सर्व त्रुटीयुक्त प्रस्तावधारक यांनी समिती कार्यालयास सर्व आवश्यक मुळ कागदपत्रांसह अभियान कालावधीमध्ये समक्ष उपस्थित राहुन त्रुटींची पुर्तता करावी जेणेकरून समितीस आपले प्रस्तावावर विहित कालमर्यादेत कागदोपत्री पुराव्यांच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेता येईल. (संबंधित प्रस्तावधारक यांना प्रकरणी असणा-या त्रुटींबाबत त्यांनी प्रस्ताव सादर करतेवेळीस दिलेल्या ई मेल द्वारे व एस. एम. एस. द्वारे अवगत करण्यात आलेले आहे)
तरी शैक्षणिक विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे व सेवा अधिक सुलभ करण्याच्या शासनाच्या उद्देशानुसार, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व समजण्यास सोपी व्हावी, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे सबब सदर उपक्रमाचा प्रस्तावधारक यांनी पुरेपुर लाभ घ्यावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती उमेश घुले यांनी केले आहे.
सेवा संकल्प अभियानांतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी विशेष त्रुटी पूर्तता शिबिर व जात पडताळणी जनजागृती उपक्रम
by Team Satara Today | published on : 22 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा