मांढरदेव (जीवन मांढरे) : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मांढरगडावर सध्या स्वयंघोषित देवऋषी, सोनेरी बाबा, सोनेरी गुरुमाता यांनी थैमान घातले आहे. भाविकांच्या श्रध्देचा गैरफायदा घेत मांढरगडावर पुन्हा अंधश्रध्देला खतपाणी घालणारे भयानक प्रकार घडत आहेत. या अघोरी प्रकारांमुळे भाविकांसह स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या, देवीच्या नावाची व गावची बदनामी करणाऱ्या लोकांवर मांढरदेवी येथील स्थानिक प्रशासन व देवस्थान ट्रस्टने अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व सुजाण भाविकांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेवी काळूबाई देवीच्या दर्शनाला महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील राज्यातून दररोज हजारोंच्या संख्येने भाविक येत असतात. मांढरदेवच्या त्या दुर्घटनेनंतर आता मांढरगडावर अनेक सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. यात्रेच्या कालावधीत प्रशासनाकडून सुविधा पुरवल्या जातात. येथील अंधश्रध्देतून होणाऱ्या प्रकारांवर देखील चांगलाच रोख लागला होता.
मात्र, काही वर्षांपासून हळूहळू करत पुन्हा देवीच्या नावाचा गैरवापर करून येथे अनेक चुकीची अघोरी कृती करणारे स्वयंघोषित देवऋषी देखील शेकडोंच्या संख्येने येवू लागले आहेत. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी देवी म्हणून काळूबाई तिच्या भक्तांच्या मनामध्ये सुप्रसिद्ध आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांमध्ये तिच्या भक्तांच्या याच श्रद्धेचा गैरफायदा घेऊन काही स्वयंघोषित गुरुवर्य, देवऋषी, तांत्रिक मांत्रिक व तृतीय पंथीयांमधून देवीच्या नावाचा चुकीचा वापर करून सोनेरी बाबा व सोनेरी गुरुमाता तयार झाले आहेत.
सोनेरी बाबा व गुरुमातांची संख्या वाढली
हे लोक देवीच्या रंजलेल्या, गांजलेल्या भक्तांवरील संकटांचा गैरफायदा घेऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात लुटण्याचे काम करत आहेत. हे लोक आपल्यात देवीचा अवतार आला आहेत असे भासवून त्यांना अनेक चुकीची कृत्य या ठिकाणी करायला लावत आहेत.एवढेच काय तर ते लोक या भक्तांना आपले पाय दह्या, दुधाने धुवायला लावून ते तीर्थ म्हणून त्या प्यायला लावण्यासारखे किळसवाणे प्रकार देखील करत आहेत.
पुन्हा अघोरी कृत्यांचे प्रकार वाढलेत
कोणाच्या नावाने झाडाला लिंबू,काळी बाहुली ठोकणे,कोणाचे वाईट व्हावे अशा प्रकारचा मजकूर लिहून,त्याला त्या संबंधिक व्यक्तीचा फोटो लावून ते झाडाला ठोकणे, जिवंत कोंबडे झाडाला खिळ्याच्या साह्याने ठोकणे,लोकांची नको ती वस्त्रे अंतर्वस्त्रे आणून ती झाडाला ठोकून तेथील परिसराचे विकृतीकरण करणे, असे अनेक अघोरी प्रकार हे लोक या ठिकाणी करत आहेत. त्या बदल्यात त्यांच्याकडून सोने, मौल्यवान वस्तू तसेच पैसे उकळण्याचे काम हे लोक करतायेत. या अघोरी व चुकीच्या मार्गाने गोळा केलेले सोने हे किलोंच्या घरात तर रोख रक्कम कोटीच्या घरात आहे. त्यांच्या या चुकीच्या कृत्यांमुळे या ठिकाणची धार्मिक वारसा असलेली औषधी वनस्पती संपन्न देवराई देखील धोक्यात आलेली आहे जी मांढरदेवची खरी नैसर्गिक संपत्ती आहे.
समाजकंटक, लुटारूंना येथे येण्यास बंदी घालावी
या सर्व स्वयंघोषित गुरुवर्यांची, देवऋष्यांची चौकशी व्हावी. भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन यांनी जमा केलेली काळी संपत्ती जप्त करून जनतेसमोर आणावी, अशी मागणी येथे येणाऱ्या भाविकांकडून केली जात आहे. अशा अंधश्रद्धा पसरविणाऱ्या देवीच्या नावाची व गावची बदनामी करणाऱ्या लोकांवर मांढरदेवी येथील स्थानिक प्रशासन व देवस्थान ट्रस्ट यांच्या कडून अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कडक कार्यवाही करून यांना वेळीच लगाम लावून देवीची अशा तऱ्हेने बदनामी करणाऱ्या समाजकंटक, लुटारूंना येथे येण्यास बंदी घालावी, अशी मागणी देवीवर श्रध्दा असलेले भाविक व स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून केली जात आहे.
मांढरदेव येथील अघोरी प्रकारांवर कारवाई करा : ग्रामस्थ व भाविकांची मागणी, श्रध्देचा गैरफायदा घेत सोनेरी बाबा व सोनेरी गुरुमांतांकडून भाविकांची लूट
by Team Satara Today | published on : 22 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा