सातारा : कराड शहर व तालुका परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय असलेल्या टोळीवर सातारा पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. टोळीप्रमुखासह तिघांना महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यांतून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, त्याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.
कराड येथील जय संजय जाधव (१९), प्रथमेश दत्तात्रय गवते (२९) आणि ओम दत्तात्रय गवते (१९) अशी हद्दपार करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही कराडमधील कोष्टी गल्ली, रविवार पेठ परिसरातील रहिवासी आहेत.
या टोळीविरुद्ध सातारा आणि सांगली जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये मोटारसायकल चोरीसह गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्यांच्यावर अटक तसेच प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, कारवाईनंतरही त्यांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच राहिल्याने पोलिसांनी हद्दपारीची कारवाई प्रस्तावित केली.
कराड शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अंतर्गत हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरणाकडे सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी कराड विभागाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी केली.
पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीनंतर तिघांना सातारा व सांगली जिल्ह्यांच्या हद्दीतून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचा आदेश देण्यात आला.
दरम्यान, गणेशोत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचे लक्ष राहणार आहे. आगामी काळात हद्दपारीसोबतच मोक्का आणि एमपीडीएअंतर्गतही कारवाया केल्या जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या कारवाईसाठी अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलिस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, महिला पोलिस कर्मचारी अनुराधा सणस तसेच कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निखील मगदुम, पोलिस कर्मचारी आनंदा जाधव व महिला पोलिस कर्मचारी सोनाली पिसाळ यांनी काम केले.
कराडमधील दुचाकी चोरांच्या टोळीला जिल्हाबंदी; सातारा-सांगलीत वर्षभर प्रवेशबंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कारवाईला वेग
by Team Satara Today | published on : 21 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा