सातारा : गुन्ह्याचा धागा पकडण्यासाठी पोलिसांना अनेकदा तासन्तास तपास करावा लागतो. मात्र, वासाच्या आधारे गुन्हेगाराचा माग काढत तपासाला नवी दिशा देणारा सातारा पोलिस दलाचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. डोबरमन पिंचर जातीच्या रिओचे रविवारी (दि. २०) निधन झाले. तब्बल दहा वर्षे पोलिस दलात सेवा बजावताना त्याने अनेक गंभीर गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
९ मार्च २०१६ रोजी रिओचा पोलिस दलात प्रवेश झाला. पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर सातारा जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी तो पोलिसांचा अविभाज्य भाग बनला. खून, दरोडा, घरफोडी, अपहरण, अग्निशस्त्र प्रकरणे तसेच बेपत्ता व्यक्तींच्या शोधासाठी त्याची मदत घेण्यात आली.
औंध कारागृहातून आरोपी पलायनाच्या घटनेत त्याने आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांना मदत केली. रहिमतपूर हद्दीतील पतसंस्था दरोडा, खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खून, सातारा तालुक्यातील म्हसवे येथील खून तसेच कराड व भुईंज परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यांच्या तपासातही रिओने महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोरेगाव आणि मल्हारपेठ हद्दीतील खून व घरफोडीच्या घटनांमध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी त्याचा उपयोग झाला.
तळबीड हद्दीतील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध आणि शिरवळ परिसरातील अग्निशस्त्र प्रकरणातील आरोपीचा माग काढण्यातही रिओची कामगिरी पोलिसांसाठी मोलाची ठरली. त्यामुळे केवळ श्वान म्हणून नव्हे, तर तपास पथकातील एका विश्वासू सहकाऱ्याप्रमाणे त्याच्याकडे पाहिले जात होते.
रिओच्या कर्तव्यनिष्ठेची दखल घेत २०२२ च्या पोलीस कर्तव्य मेळाव्यात त्याला रौप्यपदक, तर २०२४ मध्ये कांस्यपदक मिळाले. १२ फेब्रुवारी २०२६ रोजी त्याने पोलिस सेवेत दहा वर्षे पूर्ण केली. त्याची शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन त्याला आणखी एक वर्ष सेवावाढही देण्यात आली होती.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून सांधेदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच रविवारी त्याची प्राणज्योत मालवली. दहा वर्षांच्या सेवेत असंख्य तपासांना दिशा देणाऱ्या रिओच्या निधनाने सातारा पोलिस दलातील एक कर्तव्यनिष्ठ आणि विश्वासू सहकारी हरपला आहे.
रिओच्या दहा वर्षांच्या सेवेला अखेरचा सलाम; सातारा पोलिसांचा शूर ‘साथीदार’ हरपला
खून, दरोडे, घरफोडीपासून बेपत्ता व्यक्तींच्या शोधापर्यंत अनेक तपासांत बजावली निर्णायक भूमिका
by Team Satara Today | published on : 21 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा