सातारा : स्वच्छ सातारा, सुंदर सातारा’चा नारा देत सातारा नगरपालिका घरोघरी घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलनाचा उपक्रम राबवत आहे. मात्र, या व्यवस्थेचा लाभ घेण्याऐवजी शहरातील काही नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला, ओढ्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. प्रतापगंज पेठेतून सुयोग कॉलनीमार्गे अंजली कॉलनी, अर्कशाळा नगरकडे जाणार्या रस्त्यावरील ओढ्याजवळील दृश्य तर पालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेचीच खिल्ली उडविणारे ठरत आहे.
या ओढ्याच्या कठड्यावर पालिकेने ठळकपणे सापडल्यास मार खाल, कचरा टाकू नये’ असा इशारा लिहिला आहे. मात्र, या इशार्याच्या अगदी खालीच कचर्याचा मोठा ढीग साचलेला दिसत आहे. म्हणजे पाटी वाचणारे डोळे आहेत; पण तिच्यामागचा संदेश समजून घेण्याची तयारी मात्र नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातून व्यक्त होत आहे.
घराघरांतून कचरा उचलण्यासाठी घंटागाड्या फिरत असताना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची ही मानसिकता शहराच्या स्वच्छतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. विशेष म्हणजे ओढ्यात किंवा त्याच्या काठावर टाकलेला कचरा पावसाळ्यात वाहून जाऊन जलप्रवाह अडविण्याबरोबरच दुर्गंधी आणि रोगराईलाही निमंत्रण देऊ शकतो.
पालिकेने केवळ कचरा टाकू नये’ अशा पाट्या लावून मोकळे न होता, अशा ठिकाणी नियमित पाहणी, सीसीटीव्ही किंवा इतर माध्यमातून कचरा टाकणार्यांची ओळख पटवून दंडात्मक कारवाईचा धाक निर्माण करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आपल्या घरातून कचरा गेला म्हणजे जबाबदारी संपली’ अशी मानसिकता सोडण्याची गरज आहे.
पाटीखालीच कचर्याचा ढीग होत असेल, तर स्वच्छ सातारा, सुंदर सातारा’चा नारा कागदावरच राहणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
'कचरा टाकू नये'च्या पाटीखालीच कचर्याचा डोंगर! सातारा पालिकेच्या स्वच्छता मोहिमेला नागरिकांकडूनच हरताळ; कारवाईचा धाक कुठे?
by Team Satara Today | published on : 21 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा