सातारा : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेले सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कवठे गावचे रहिवासी शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास हा केवळ एका कुटुंबाच्या धैर्याची कथा नसून, संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असा लढा आहे. १८ वर्षांपूर्वी पती गमावल्यानंतर, खचून न जाता त्यांनी घेतलेली भरारी आणि आता त्याच खाकी वर्दीत देशसेवेसाठी सज्ज होणे, हा प्रवास प्रत्येक महिलेला आणि नागरिकाला प्रेरणा देणारा आहे.
कल्पना पवार यांच्या संघर्षाची आणि बलिदानाची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांना थेट परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्त करण्याचे आदेश दिले.
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलीस अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांनी पोलीस सेवेत नवी जबाबदारी स्वीकारली आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या श्रीरामपूर येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक म्हणून रुजू झाल्या आहेत. पतीच्या देशसेवेचा वारसा पुढे नेत त्यांनी मिळवलेले हे यश प्रेरणादायी मानले जात आहे. वैयक्तिक आयुष्यातील मोठ्या आव्हानांनंतरही त्यांनी खचून न जाता पोलीस सेवेत प्रवेश करून कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रवासातून जिद्द, धैर्य आणि सेवाभावाचा संदेश मिळतो. अंबादास पवार यांच्या बलिदानाची आठवण कायम ठेवत कल्पना पवार आता पोलीस अधिकारी म्हणून समाजाच्या सेवेत कार्यरत होणार आहेत. त्यांच्या या नव्या भूमिकेबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
शहीद अंबादास पवार हे सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील कवठे गावचे रहिवासी होते. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान प्रवाशांचे प्राण वाचविताना हुतात्मा झालेले पोलिस शिपाई अंबादास पवार यांचे बलिदानही याच इतिहासाचा अविभाज्य भाग आहे.
अंबादास पवार यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, काळ पुढे सरकत असताना त्यांच्या पत्नी कल्पना पवार यांनी पतीच्या बलिदानातून प्रेरणा घेतली आणि देशसेवेचा मार्ग निवडला. आता त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या थेट नियुक्तीच्या आदेशानंतर कल्पना पवार यांनी नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत ११ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणानंतर मंगळवारी त्यांनी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात ‘प्रशिक्षणार्थी प्रभारी पोलिस अधिकारी’ म्हणून पदभार स्वीकारला.
कवठे येथील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना पोलीस उपाअधीक्षक म्हणून थेट नियुक्ती; खाकी वर्दीत देशसेवेसाठी सज्ज
by Team Satara Today | published on : 20 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा