मुंबई : दिशा सालियान प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांनी एक X पोस्ट केली असून या पोस्टमध्ये दिशा सालियान यांच्या वकिलांनी या प्रकरणासंदर्भात सादर केलेल्या कागदपत्रामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून ज्येष्ठ केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचा उल्लेख करण्यात आला आहे यावरून प्रश्न उपस्थित केले आहेत. 'असा सामूहिक अत्याचार होताना हे प्रत्यक्षदर्शी महाशय शांत राहून अत्याचार का पहात बसले होते? हस्तक्षेप का केला नाही?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
अखिल चित्रे यांनी आपल्या पोस्टमध्ये '१२ जानेवारी २०२४ रोजी Exhibit ‘A’ मधील पान क्रमांक २३३ वर मुद्दा क्रमांक २ मध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांचा उल्लेख आहे', असा दावा केलाय. या एक्स पोस्टनंतर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. खून होताना दिसतोय तरी मान्यवर प्रत्यक्षदर्शीने ते रोखण्यासाठी काहीच का केलं नाही?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत देखील कडाडले
यादरम्यानच आता अखिल चित्रे यांच्या या सोशल मीडिया पोस्टद्वारे करण्यात आलेल्या दाव्याने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. दिशा सालियान प्रकरणी संजय राऊत यांनी देखील शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, हा विषय मीडियाचा आहे काही लोकांच्या प्रसिद्धीचा आहे. चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवायची आहे. त्यांना अब्रू आहे आम्हाला नाही का? असा सवाल त्यांनी केला.
त्यांनी दिशा सालियानच्या वडिलांचे नाव न घेता टीका केली की कुणाच्या तरी हातचं बाहुलं बनून चिखलफेक करत आहेत. बेवड्यांचे आणि क्रूरांचे बडवे त्यांना नियंत्रित करत आहेत. संयमाचा बांध फुटल्यावर मी देखील बोलेन असा इशारा देखील द्यायला राऊत विसरले नाहीत.
...तर राणे राहिले नसते
संजय राऊत पुढे म्हणाले की, सहा वर्षापूर्वी दिशाच्या वडिलांचे समाधान झाले होते. मात्र जेव्हा ठाकरे राजकारणात पुढे जातात तेव्हा मग अशी प्रकरणं उकरून काढली जातात. मला माहिती आहे या मागे कोण आहे. बॅरिस्टर बोलत आहेत त्याची देखील कुंडली काढणार आहे. गेल्या वीस वर्षात जुवेकर, अंकूश राणे, गोवेकर, नाईक इत्यादींचे खून झालेत. त्यात राणेंना अटक झाली पाहिजे. याची जर चौकशी झाली असती हे प्रकरण दडपलं नसतं तर राणे राहिले नसते असा खळबळजनक दावा देखील राऊत यांनी केला.
'दिशाप्रकरणात राणे पितापुत्र 'प्रत्यक्षदर्शी' साक्षीदार', शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रे यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा
by Team Satara Today | published on : 19 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा