दरे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवानिमित्त दरे गावात आले आहेत. दरे गावातील त्यांच्या शेतीमध्ये विविध प्रयोग केले जात असून, आज जागतिक बांबू लागवड दिवसानिमित्त त्यांनी बांबूची लागवड केली. यावेळी त्यांनी शेती, दुष्काळसदृश्य परिस्थिती आणि विरोधकांकडून होणाऱ्या टीकेवर भाष्य केलं.
“मी गणेशोत्सवानिमित्त दरे गावी आलेलो आहे. मी नाराज नाही,” असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मात्र, आपण या भागात आल्यानंतर काही लोकांना नेहमीच पोटदुखी होत असल्याची मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. “आता पोटदुखीवरसुद्धा कोणतं झाड आहे ते बघणार आहे आणि त्याची लागवड करणार आहे. किंवा त्यांना जमाल गोटा दिला पाहिजे,” असं शिंदे म्हणाले.
दरे गावात येणं, दिल्लीला जाणं किंवा लंडन दौरा करणं, या प्रत्येक गोष्टीवर विरोधकांकडून टीका होत असल्याचंही त्यांनी म्हटलं. “विरोधकांच्या आरोपांना टीका करून उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईन. मी कामाचा माणूस आहे,” असं शिंदे यांनी सांगितलं.
विरोधकांच्या आरोपांना टीका करून उत्तर देणार नाही. मी कामातून उत्तर देईन - एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा
by Team Satara Today | published on : 18 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा