कराड : येथील आगाशिवनगर परिसरात बिबट्याने दोन तास चांगलाच धुमाकूळ घातला. आगाशिव डोंगरावरून बॅकवर्ड सोसायटीसह इंद्रप्रस्थ कॉलनीत कुत्र्याने पाठलाग केल्यामुळे बिबट्या कराड-ढेबेवाडी रस्त्यालगत मोकळ्या जागेत एका बंद खोक्यात शिरला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू करून बिबट्याला जेरबंद केले.
आज, शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आगाशिव डोंगरावरून बिबट्या बॅकवर्ड सोसायटी, इंद्रप्रस्थ कॉलनीसह परिसरात फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. काही कुत्री त्याचा पाठलाग करत असल्याचे पाहणाऱ्यांनी सांगितले. सैरावैरा झालेल्या या बिबट्याने इंद्रप्रस्थ कॉलनीतून थेट कराड ढेबेवाडी रस्त्यालगत आयोध्या कॉलनीतील मोकळ्या जागेत धूम ठोकली. एका बंद खोक्याचा बिबट्याने आसारा घेतला.
घटनेची तत्काळ माहिती वन विभागाला देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी व वन्यजिव संरक्षक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बिबट्या भरवस्तीत आल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीमुळे कराड ढेबेवाडी रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाच्या अधिकारी व वन्यजीव रक्षक सदस्यानी रेस्क्यू करत बिबट्याला पकडण्यात यश आले. मात्र भरवस्तीत बिबट्याने धुमाकूळ घातल्यामुळे आगाशिवनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
जाळीत पकडून त्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यातून वराडे येथील वन्यजीव तपासणी केंद्रात नेण्यात आले. बिबट्याला पकडण्यासाठी सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहा. वनसंरक्षक जयश्री जाधव, कराड वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनरक्षक सुनिता जाधव, दशरथ चिट्टे, वनपाल कैलास सानप, प्रशांत मोहिते, भारत पाटील, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, भरत पवार, अमोल माने, वनमजूर बाबा भंडलकर, वाहन चालक योगेश बडेकर यांच्यासह रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. बिबट्याला वेळेत पकडल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. पकडलेल्या बिबट्या साधारणता पाच महिन्याचा असावा असा अंदाज वनक्षेत्रपाल ललिता पाटील यांनी व्यक्त केला.
आगाशिवनगर परिसरात बिबट्याने दोन तास धुमाकूळ; वनविभागाने रेस्क्यू करून बिबट्याला जेरबंद केले
by Team Satara Today | published on : 18 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा