सातार्‍यात दहशत माजविणार्‍या टोळीला शाहूपुरी पोलिसांचा दणका

खूनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, धमकीसह गंभीर गुन्ह्यांची मालिका; टोळीप्रमुखासह तिघांवर मोक्का’, विधिसंघर्षग्रस्त बालकाचाही समावेश

by Team Satara Today | published on : 18 September 2026


सातारा : सातारा शहरात दहशत निर्माण करून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना लक्ष्य करणार्‍या गुन्हेगारी टोळीवर शाहूपुरी पोलिसांनी थेट मोक्का’चा फास टाकला आहे. खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरदस्तीने पैसे उकळणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी आणि जिवे मारण्याची धमकी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या टोळीविरुद्ध ही कारवाई करण्यात आली. टोळीप्रमुख प्रेम गणेश पवार (वय 22, रा. शुक्रवार पेठ, सातारा), प्रेम आबासाहेब अडागळे (21), आनंद ऊर्फ आण्णा लक्ष्मण माने (21) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा कारवाईत समावेश आहे.
शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक 204/2026च्या तपासातून टोळीच्या गुन्हेगारी कारवायांचे स्वरूप समोर आले. संबंधित आरोपी संघटितपणे गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दहशतीच्या जोरावर आर्थिक तसेच इतर फायदे मिळविण्याचा प्रयत्न केल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.
या टोळीच्या कारवायांना आळा घालण्यासाठी शाहूपुरी पोलिसांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केला. पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी हा प्रस्ताव पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यामार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्याकडे सादर केला. प्रस्तावातील कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी संबंधित गुन्ह्यात मोक्का कायद्याच्या तरतुदी लागू करण्यास मंजुरी दिली.
या गुन्ह्यात बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्यासारखे गंभीर आरोपही आहेत. त्यामुळे केवळ एखाद्या घटनेपुरती कारवाई न करता संघटित गुन्हेगारीच्या मुळावर घाव घालण्याचा प्रयत्न शाहूपुरी पोलिसांनी केला आहे.
सातारा शहरातील गुन्हेगारी टोळ्यांच्या हालचालींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण करणार्‍यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. संघटितपणे गुन्हे करणार्‍या टोळ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध मोक्कासह कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
मोक्का कारवाईनंतर या प्रकरणाचा पुढील तपास सातारा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर तसेच स्थानिक गुन्हे शाखा व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी कारवाईत भाग घेतला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात सामूहिक दीप प्रज्वलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा
पुढील बातमी
किरकोळ वादातून थेट बंदुकीचा धाक; दोघांना गोळ्या घालण्याची धमकी

संबंधित बातम्या