बाप्पांच्या आगमनावेळी पालमध्ये दोन मंडळांमध्ये तुफान हाणामारी, सात जण जखमी

दोन वाहनांची तोडफोड, परस्पर विरोधी फिर्यादी, १४ जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 16 September 2026


कराड : पाल (ता. कराड) येथे बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष सुरू असतानाच दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये जुन्या वादातून जोरदार हाणामारी झाली. सोमवारी (दि. १४) रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या घटनेत दोन्ही गटांतील सात जण जखमी झाले. या राड्यात दोन वाहनांची तोडफोड झाली. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून १४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.
प्रमोद बबन शिंदे (वय ४७, रा. पाल) यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून ओमकार पवार, सागर देशमुख, धनंजय घाडगे, रामराव पवार यांचा धाकटा मुलगा, आर्यन पवार, संभाजी पवार, बंटी घाडगे व सुमित यादव (सर्व रा. पाल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी प्रमोद शिंदे आणि त्यांच्या साथीदारांनी ओमकार विठ्ठल पवार व उदय प्रवीण वाघ यांना जुन्या वादाविषयी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी प्रमोद शिंदे, त्यांचा मुलगा पृथ्वीराज, पुतण्या ओमकार सोमनाथ शिंदे, सोमनाथ मल्हारी शिंदे व शुभम शिवराज भोसले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दरम्यान, सागर देशमुख याने काठीने प्रमोद शिंदे यांच्या डोक्यात मारहाण केली. ओमकार पवार याने लोखंडी वस्तूने पृथ्वीराज शिंदे व शुभम भोसले यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. धनंजय घाडगे याने काठीने ओमकार शिंदे यांना मारहाण केली. तसेच दुचाकीची तोडफोड केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे.
दुसऱ्या गटाचीही फिर्याद
दुसऱ्या गटातील ओमकार दत्तात्रय पवार (२६, रा. पाल) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी राज प्रमोद शिंदे, प्रसाद सुकटे, शुभम भोसले, करण एटणे, प्रमोद शिंदे व गणेश भोसले (सर्व रा. पाल) यांच्यावर गुन्हा दाखल केला. सोमवारी रात्री ओमकार पवार हे त्यांच्या घरासमोर असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून राज शिंदे, प्रसाद सुकटे व शुभम भोसले यांनी त्यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर करण एटणे, प्रमोद शिंदे व गणेश भोसले यांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
दोन गटातील वादात ओमकार पवार यांच्या कारची तोडफोड झाली, तर दुसऱ्या गटातील प्रमोद शिंदे यांच्या दुचाकीची तोडफोड झाली. मारहाणीच्या घटनेमुळे पालमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच उंब्रज पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
वादानंतर पोलिसांनी दोन्ही मंडळातील पदाधिकाऱ्यांना बोलवून समज दिली. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दोन्ही गटात सामंजस्य घडवून आणले. तसेच सर्वानुमते मंगळवारी सायंकाळी दोन्ही मंडळांच्या गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन करण्यात आले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
येत्या पाच वर्षांत कृष्णा सहकारी कारखान्याचे सर्वात मोठे विस्तारीकरण करणार : सुरेश भोसले, ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
पुढील बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूपीआयवर आकारला जाणारा कर मागे घ्यावा; कर आकारण्याचा निर्णयावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल

संबंधित बातम्या