येत्या पाच वर्षांत कृष्णा सहकारी कारखान्याचे सर्वात मोठे विस्तारीकरण करणार : सुरेश भोसले, ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

by Team Satara Today | published on : 16 September 2026


कराड : कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा प्रवास हा १,२०० मेट्रिक टन ते १२,००० मेट्रिक टन असा झाला आहे. या कालखंडात कारखान्याने अनेक टप्पे पार केले आहेत. पण, येत्या पाच वर्षांत कारखान्याच्या इतिहासातील सर्वात मोठे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. चांगले काम केल्याच्या पाऊलखुणा ठेवून मला जायचे आहे, असे सांगत आता आपली ही शेवटचीच टर्म असल्याचे प्रतिपादन कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले.
शिवनगर (ता. कराड) येथे यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ७० वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश भोसले होते. तर आमदार डॉ. अतुल भोसले, माजी आमदार भगवानराव साळुंखे, कारखान्याचे उपाध्यक्ष जयवंत मोरे यांच्यासह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार डॉ. अतुल भोसले म्हणाले, गत संचालक मंडळाने चांगले काम केले. त्यावर नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालाने शिक्कामोर्तब झाले आहे. संचालक मंडळाने गेल्या ११ वर्षांत २६९ कोटी रुपयांचे दीर्घमुदतीचे कर्ज फेडले. विक्रमी गाळप, विक्रमी उत्पादन करणारा कृष्णा कारखाना राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे, ही बाब आपणा सर्वांसाठी अभिमानाची आहे. ऊस दरात कारखाना पुढे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
विषयपत्रिकेचे वाचन मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी केले. उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष जयवंत मोरे यांनी केले. संचालक धोंडीराम जाधव यांनी आभार मानले.
''कृष्णा'' सहकारीच राहणार
''कृष्णा''च्या अनेक निवडणुकांत विरोधकांनी आम्ही त्याचे खासगीकरण करू, असे आरोप केले. पण, तसे घडले नाही आणि घडणारही नाही. तो सहकारीच राहणार, असे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.
ठराव एकमताने मंजूर, एकही प्रश्न नाही
विषयपत्रिकेवरील व आयत्या वेळचे सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजूर केले. सभेच्या अनुषंगाने शंका निरसनासाठी सभासदांचे प्रश्न मागवले जातात. पण, यावर्षी सभासदांकडून एकही प्रश्न आला नसल्याचे सांगण्यात आले. हाच धागा पकडत डॉ. अतुल भोसले यांनी, सभासदांचा संचालक मंडळावर असणारा हा विश्वास असल्याचे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला प्रतिसाद दिला.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सलग १३ तास ७ मिनिटे पोहून पार केलं ८९ किलोमीटर अंतर; सातारच्या चित्राणी नवले हिची मुर्शिदाबाद येथील स्पर्धेत कामगिरी
पुढील बातमी
बाप्पांच्या आगमनावेळी पालमध्ये दोन मंडळांमध्ये तुफान हाणामारी, सात जण जखमी

संबंधित बातम्या