नो-एंट्रीत वाहन अडवल्याने होमगार्डला मारहाण प्रकरणी वाई पोलिसांत गुन्हा दाखल; जबरदस्तीने गाडीत बसवून नेले

by Team Satara Today | published on : 15 September 2026


वाई  : नो-एंट्रीमध्ये चारचाकी वाहन घातल्याने ते अडविल्याच्या रागातून वाहनचालकाने कर्तव्यावर असलेल्या होमगार्डला शिवीगाळ व दमदाटी करून हाताने आणि बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना वाई शहरातील पीआर चौक येथे घडली. एवढेच नव्हे तर होमगार्डला जबरदस्तीने स्वतःच्या वाहनात बसवून किसनवीर कॉलेजच्या दिशेने नेल्याचा प्रकारही समोर आला आहे. याप्रकरणी वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
होमगार्ड श्रीकांत जगन्नाथ शेटे (वय ५६, रा. रविवार पेठ, वाई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास शेटे हे पीआर चौक, वाई येथील नो-एंट्री पॉईंटवर कर्तव्य बजावत होते. त्यावेळी स्वप्नील अशोक ऊर्फ बापू गायकवाड (रा. पसरणी, ता. वाई) हा एम.एच ११ डी.एन. १६८९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून नो-एंट्रीमध्ये आला.
होमगार्ड शेटे यांनी वाहन अडविल्यानंतर गायकवाड याने गाडीतून खाली उतरून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर हाताने व बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच, "माझ्याविरुद्ध तक्रार दिलीस तर तुला सोडणार नाही," अशी धमकी देत शेटे यांना जबरदस्तीने आपल्या वाहनात बसवून किसनवीर कॉलेजच्या दिशेने वाहन नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, किसनवीर कॉलेजजवळ वाई पोलिस ठाण्याचे सपोनि जाधव दिसल्यानंतर गायकवाड याने वाहन थांबवून होमगार्डला खाली उतरविल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी स्वप्नील अशोक ऊर्फ बापू गायकवाड याच्याविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २७३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १४०(२), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी स्वप्नील गायकवाडला अटक केली आहे.अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुर्वे करत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रलंबित प्रश्‍नांवर माध्यमिक शिक्षक आक्रमक; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन; प्रा. नंदकुमार सागर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाची भेट; सात प्रमुख मागण्यांवर कार्यवाहीची मागणी

संबंधित बातम्या