सातारा जिल्हा परिषदेत अभियंता दिन उत्साहात साजरा; अभियंत्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी आदर्श अभियंता पुरस्कार’ देण्याची घोषणा

by Team Satara Today | published on : 15 September 2026


सातारा : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर हा अभियंता दिन सातारा जिल्हा परिषद मुख्य इमारतीच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. अभियंता दिनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभियंता अंकिता सुतार यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियंता विजय खामकर यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष अभियंता कृष्णात फडतरे यांनी भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अतुलनीय योगदानाची माहिती उपस्थितांना दिली. सर विश्वेश्वरय्या यांनी आपल्या दूरदृष्टी, शिस्त, कार्यतत्परता आणि अभियांत्रिकी कौशल्याच्या जोरावर देशाच्या विकासाला दिलेले योगदान आजच्या अभियंत्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी खलीपे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई उपस्थित होते.
तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता संजय खोत, बांधकाम विभाग दक्षिणचे कार्यकारी अभियंता अभियंता विद्याधर शिंदे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता शेजवळ, मृदा व जलसंधारण विभागाचे अभियंता कुंभार यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक तसेच मोठ्या संख्येने अभियंता बांधव उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांनी जिल्हा परिषदेमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणार्‍या शाखा अभियंत्यांचा गौरव करण्यासाठी लवकरच आदर्श अभियंता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. हा पुरस्कार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले, राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब तसेच ना. मकरंद पाटील या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
ग्रामीण भागाच्या विकासामध्ये अभियंत्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून रस्ते, पूल, शाळा, आरोग्य केंद्रे, पाणीपुरवठा, जलसंधारण यांसह विविध विकासकामांच्या माध्यमातून अभियंते ग्रामीण विकासाचा कणा म्हणून कार्य करीत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने आदर्श अभियंता पुरस्कार’ ही निश्चितच प्रेरणादायी बाब असल्याचे यावेळी उपस्थितांनी नमूद केले.
अभियंता दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमामुळे अभियंता बांधवांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. एकजूट, कार्यतत्परता आणि ग्रामीण विकासासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचा संदेश देत अभियंता दिनाचा कार्यक्रम उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा परिषदेत भक्तिमय वातावरणात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना; दि. 22 सप्टेंबर 2026 रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन
पुढील बातमी
नवरात्रीत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना नवी झळाळी; बिल्डर असोसिएशनकडून 2.11 लाखांची मदत; उर्वरित निधीसाठी प्रायोजकांचा आधार

संबंधित बातम्या