प्रतापगडावरील अफझल खान कबरीच्या सभोवतालच्या 300 मीटर परिसरात कलम 163 लागू; पोलिसांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी

by Team Satara Today | published on : 15 September 2026


सातारा : प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफझल खान कबरीच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, अफझल खान कबरीच्या सभोवतालच्या ३०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत. ९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत हे आदेश अंमलात असतील. या कालावधीत परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये आणि संभाव्य अनुचित घटना टाळता याव्यात, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
प्रतापगड परिसराला ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व असल्याने येथे विविध ठिकाणांहून पर्यटक व नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे संवेदनशील परिसरात कोणत्याही प्रकारची गर्दी, घोषणाबाजी किंवा वाद निर्माण होऊन परिस्थिती चिघळू नये, यासाठी प्रशासनाने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे.
आदेशाच्या कालावधीत संबंधित परिसरात पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाऊ शकते. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून शांतता व सुव्यवस्था राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील १८ जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती; आकडेवारी मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

संबंधित बातम्या