आंदोलनाचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांचे जरांगेंना आवाहन; एकटाच मुंबईला जाणार; मनोज जरांगे भूमिकेवर ठाम

by Team Satara Today | published on : 15 September 2026


मुंबई : सध्या गणेशपर्व सुरू असताना मुंबईत आंदोलन करून गणेशभक्तांना असुविधा होईल, असे वागणे कोणासाठीच योग्य नाही. त्यामुळे मुंबईतील आंदोलनाचा पुनर्विचार व्हावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारल्यानंतर आता एकटेच मुंबईला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मराठा आंदोलकांच्या जवळपास सर्वच मागण्या राज्य सरकारने पूर्ण केल्या आहेत. काही मागण्या न्यायालयाच्या निर्णयाधीन आहेत. न्यायालय किंवा इतर संवैधानिक पद्धतींचा अवलंब करूनच त्या आपण पूर्ण करू शकतो.
गणेशोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी देखील गणेशाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
'जवळपास सर्वच मागण्या मान्य'
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या जवळपास सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. ज्या मागण्या राज्यघटनेला अनुसरून आहेत त्या मान्य करायला तयार आहोत. पण ज्या मागण्या कायदा, न्यायालयीन नियम यांच्या बाहेरच्या असतील त्या मान्य करू शकत नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
आम्ही चर्चेची दारे बंदही केलेली नाहीत. सध्या गणेशोत्सव सुरू आहे, गणेशभक्तांना असुविधा होईल, असे कोणी वागू नये. त्यामुळे मुंबई आंदोलन करण्याबाबत पुनर्विचार व्हावा असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
पाणी, सलाईन व औषधोपचार बंद
वडीगोद्री (जि. जालना) : मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर उपोषणास परवानगी नाकारल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एकटेच मुंबईला जाण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. गेल्या १७दिवसांपासून ते अंतरवाली सराटी येथे उपोषण करीत आहेत. समाजाने सध्या मुंबईत येऊ नये; योग्य वेळी मी स्वतः बोलावेन, असेही ते म्हणाले.
अंतरवाली सराटीतून मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. पाणी, सलाईन व औषधोपचार बंदच ठेवणार असून आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नाव आहे म्हणून लगेच निष्कर्ष काढता येणार नाही, सर्व गोष्टी तपासून घेण्याची गरज; दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणावर भाजप नेते प्रसाद लाड यांची भूमिका
पुढील बातमी
'स्वाभिमानी'ची २५ वी ऊस परिषद १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे होणार; संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची घोषणा

संबंधित बातम्या