मुंबई : महाराष्ट्रातील गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक, परवाना आणि देखरेख प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता व कार्यक्षमता आणण्यासाठी महसूल विभागाने तयार केलेल्या ‘महाखनिज २.०’ या अत्याधुनिक डिजिटल प्रणालीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आले.
गौण खनिजांच्या व्यवस्थापनाची पारंपरिक प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात कागदी व मानवी हस्तक्षेपाची असल्याने त्यात देखरेख ठेवताना अनेक अडचणी येत होत्या. त्यावर मात करत गौण खनिज प्रशासनाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे प्रशासनात डिजिटल क्रांती घडून येत आहे.
महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी याबद्दलचे सादरीकरण केले. यावेळी कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सहसचिव मनीषा जयभाये, रेलटेल कंपनीचे प्रमुख विनोद अग्रवाल आणि कोकण सहआयुक्त रवींद्र पवार उपस्थित होते.
‘महाखनिज’ प्रणालीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांत राज्य शासनाच्या तिजोरीत सुमारे १६,००० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. आता ‘महाखनिज २.०’ या नवीन व प्रगत आवृत्तीच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांत २५,००० कोटी रुपयांचे महसूल संकलनाचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
खनिज चोरांवर आता 'डिजिटल' वॉच! 'महाखनिज २.०' प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; २५ हजार कोटींच्या महसुलाचे उद्दिष्ट
by Team Satara Today | published on : 15 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा