सलग सुट्ट्यांमुळे पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडीचा अक्षरशः कहर; पारगाव-खंडाळा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

by Team Satara Today | published on : 14 September 2026


खंडाळा : गणेशोत्सवाला जोडून आलेल्या शनिवार-रविवारच्या सलग सुट्ट्यांमुळे पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडीने अक्षरशः कहर केला आहे. शनिवारी दिवसभरानंतर रविवारीही सकाळी साडेसातपासून दुपारी बारापर्यंत पारगाव-खंडाळा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत वाहतूक ठप्प झाल्याने गणेशभक्तांसह वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.
शनिवारी सकाळपासून रात्री दहापर्यंत महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. रविवारी सकाळी पुन्हा वाहनांची संख्या झपाट्याने वाढल्याने पारगाव-खंडाळा परिसरातील महामार्ग तसेच सेवा मार्ग वाहनांच्या गर्दीने फुलून गेले. दुपारी बारानंतर वाहनांची संख्या काहीशी कमी झाल्याने वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महामार्ग पोलिसांसह खंडाळा व शिरवळ पोलिसांनी महामार्गावर ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. सर्व उपलब्ध मार्ग खुले करून वाहनांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, काही वाहनचालकांकडून नियमांचे पालन न झाल्याने वाहतुकीचा खोळंबा होत होता. वाहनांची बेसुमार संख्या आणि अरुंद ठिकाणी होणारी कोंडी यामुळे पोलिसांच्या प्रयत्नांवरही मर्यादा आल्या. सेवा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने आल्याने स्थानिक नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागला.
गणेशोत्सव, सण-समारंभ किंवा विकेंडच्या सुट्ट्या आल्या की या मार्गावर वाहतूक कोंडी होणे नित्याचे झाले आहे. प्रशासनाकडून वाहतूक नियोजन केले जात असले, तरी वाहनांची वाढती संख्या, बेशिस्त वाहनचालक आणि अपूर्ण रस्त्यांची कामे यामुळे कोंडीची समस्या कायम आहे. रविवारी महामार्ग पोलीस, खंडाळा व शिरवळ पोलिसांनी सतर्क राहून वाहतूक सुरळीत करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे शनिवारीच्या तुलनेत मोठी कोंडी टाळण्यात यश आले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कास पठारावरील फुलांचा हंगाम ऐन बहरात; पर्यटकांनी कास परिसर फुलून गेला, पर्यटकांच्या सेवेसाठी १६८ कर्मचाऱ्यांचा ताफा
पुढील बातमी
नागपुरात होणाऱ्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार समान नागरी कायदा विधेयक, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

संबंधित बातम्या