गणेशोत्सवात सातारा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; 547 गावांत ‘एक गाव, एक गणपती’, 2900 पोलिसांसह एसआरपीएफ, क्यूआरटी, होमगार्ड तैनात

by Team Satara Today | published on : 13 September 2026


सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सातारा पोलीस दल सज्ज झाले आहे. 14 ते 25 सप्टेंबरदरम्यान होणार्‍या उत्सवासाठी जिल्ह्यात 589 सार्वजनिक गणेशमूर्तींसह तब्बल 2 लाख 75 हजार 192 घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईबरोबरच मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
उत्सव काळात एक पोलीस अधीक्षक, एक अपर पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपअधीक्षक, 129 पोलीस अधिकारी, 2900 पोलीस अंमलदार आणि 1100 होमगार्ड बंदोबस्तासाठी कार्यरत राहणार आहेत. याशिवाय एसआरपीएफची एक कंपनी, तीन आरसीपी पथके आणि एक क्यूआरटी पथक तैनात करण्यात आले आहे. संवेदनशील भागात सीसीटीव्ही तसेच ड्रोनच्या माध्यमातून पोलिसांची नजर राहणार आहे.
547 गावांत ‘एक गाव, एक गणपती’
जिल्ह्यातील 547 गावांनी यंदा ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाला प्रतिसाद दिला आहे. सातारा, कराड, फलटण, वाई यांसह प्रमुख शहरांमध्ये दंगा नियंत्रण पथकांचा सराव, रूट मार्च आणि कॉम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी शांतता समित्यांच्या बैठका घेऊन गणेश मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधला आहे.
मिरवणुकांमध्ये सामाजिक सलोखा बिघडविणार्‍या घोषणा, आक्षेपार्ह पोस्टर्स अथवा देखावे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशमूर्तींच्या दर्शनासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा, परवानगीशिवाय होर्डिंग-बोर्ड न लावणे, तसेच फ्लायर्स, लेझर व लेझर बीम आणि साउंड प्रेशर यंत्रणेबाबतही नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक कारवाईलाही वेग
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 अन्वये 15 हजार 600 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत 1 हजार 470 जणांवर कारवाई, तर कलम 170 अन्वये 467 जणांना हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत 38 जणांवर तडीपार कारवाई करण्यात आली आहे.
ध्वनिप्रदूषण व लोकसेवकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले आहेत. नियमभंगाची तक्रार नागरिकांनी डायल 112 किंवा संबंधित पोलीस ठाण्याच्या सीयूजी क्रमांकावर फोन अथवा व्हॉट्सऍपद्वारे करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उत्सव आनंदात, शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जानकर कॉलनीत अखेर कासचे पाणी; वर्षानुवर्षांच्या पाणीटंचाईला मिळाला दिलासा; अशोक शेडगे, वसंत लेवे यांच्या पाठपुराव्याला यश
पुढील बातमी
सातार्‍यातील सेव्हन स्टार इमारतीसमोरील भाजी मंडईत मोबाईल चोरट्यास नागरिकांकडून चोप; गुन्हा दाखल

संबंधित बातम्या