सातारा : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच शाहूनगरी सातारा गणेशोत्सवाच्या जल्लोषात न्हाऊन निघाली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख बाजारपेठा, चौक आणि रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेले. मोती चौक ते पाचशे एक पाटी तसेच मोती चौक ते देवी चौक परिसरात दिवसभर नागरिकांची मोठी गर्दी राहिल्याने वाहतूक सुरळीत ठेवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांच्या आगमन मिरवणुकांनी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सातार्यातील विविध गणेशोत्सव मंडळांनी भव्य मंडप, आकर्षक देखावे आणि विद्युत रोषणाईची जय्यत तयारी केली आहे. मानाचे गणपती तसेच विविध मंडळांच्या गणरायांच्या आगमनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, शहरातील प्रमुख चौक आणि रस्ते सजावटीने उजळून निघाले आहेत. राजवाडा परिसर, मोती चौक आणि पोवई नाका परिसरातील बाजारपेठांमध्ये गणेशमूर्ती, पूजेचे साहित्य, फुले, सजावटीच्या वस्तू आणि मोदकांच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली.
यंदाचा गणेशोत्सव 12 दिवसांचा असल्याने गणेशभक्तांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी मंडळांमध्येही मोठी तयारी सुरू असून, पारंपरिक वाद्यांना यंदा विशेष पसंती मिळताना दिसत आहे. ढोल-ताशा, लेझीम पथकांच्या तालावर गणरायाचे स्वागत करण्याकडे अनेक मंडळांचा कल असल्याचे आगमन मिरवणुकांवरून स्पष्ट झाले.
डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांना पसंती
ध्वनीवर्धक यंत्रणांसाठी पोलिसांनी 72 डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. डीजेच्या दणदणाटावर निर्बंध असल्याने अनेक मंडळांनी ढोल-ताशा, लेझीम आणि पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गणरायाच्या आगमन मिरवणुकांमध्ये पारंपरिक संस्कृतीचा बाज अधिक ठळकपणे पाहायला मिळाला.
2900 पोलिसांचा बंदोबस्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सुमारे 2900 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सातारा शहरात गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, मंडळांच्या मिरवणुका आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. प्रमुख चौकांमध्ये पोलिस कर्मचारी तैनात असून, वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी दिवसभर पोलिसांची धावपळ सुरू होती.
छत्रपती शाहू महाराजांच्या वास्तव्याने ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख निर्माण झालेल्या शाहूनगरीत गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. यंदाही ही परंपरा कायम राखत भक्तिमय वातावरणात गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली असून, उद्यापासून शहरातील गणेशोत्सवाचा जल्लोष आणखी रंगणार आहे.
श्री गणरायाच्या स्वागतासाठी शाहूनगरी सज्ज; ढोल-ताशांचा गजर, रोषणाईने उजळले शहर; मोती चौक ते देवी चौक परिसरात गणेशभक्तांची गर्दी
by Team Satara Today | published on : 13 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा