सातारा : ‘कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावर तापोळा-आहिर दरम्यान उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक केबल स्टे ब्रिजचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. हा पूल अद्याप कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसला तरी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काही दिवस तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या काळात पुलावरून प्रवास करताना नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घ्यावी,’ असे आवाहन महाबळेश्वर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आकाश पाटील यांनी केले आहे.
पुलाचे काम टी अँड टी कंपनीमार्फत सुरू असून, कंपनीसोबत झालेल्या चर्चेनुसार रविवारी (दि. १३) ते रविवारी (दि. २०) या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत वाहतूक सुरू ठेवण्यात येणार आहे. रात्री ९ ते सकाळी ८ या वेळेत पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे.
वाहनचालकांनी काळजी घ्यावी
पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाहनांना तार, खिळे किंवा लोखंडी साहित्य लागून पंक्चर अथवा नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कंपनीची राहणार नाही. तसेच पुलावर काम सुरू असताना वाहनचालकांनी कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. कोणत्याही कारणावरून कामगारांशी वाद घालू नये, तसेच वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन टी अँड टी कंपनीतर्फे करण्यात आले आहे.
आहिर-तापोळा केबल स्टे ब्रीजवरून प्रवास करताना खबरदारी घ्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांचे आवाहन
by Team Satara Today | published on : 13 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा