वडूज येथे महावितरण कार्यालयाच्या दारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन,कार्यकारी अभियंता भीमराव म्हस्के यांना रस्त्यावरच घेराव

by Team Satara Today | published on : 13 September 2026


वडूज : खटाव तालुक्यातील शेतकरी व वाडीवस्तीवरील घरगुती ग्राहक अनियमित वीजपुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना पदाधिकारी, शेतकरी, दूध उत्पादक व ग्राहकांनी महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता भीमराव म्हस्के यांना रस्त्यावरच घेराव घातला. महावितरण कार्यालयाच्या दारात भोंगळ कारभाराबाबत घोषणाबाजी करत बोंबाबोंब आंदोलन केले.    
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार, युवक प्रदेशाध्यक्ष सूर्यभान जाधव, शिवसंकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभयसिंह जगताप, जिल्हा परिषद सदस्य संदीप मांडवे, पंचायत समिती सदस्य महेश वाघ, तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे, शेतकरी व दुग्ध उत्पादक शेतकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
महावितरणाच्या अनियमित पुरवठ्यामुळे हातातोंडाशी आलेली पिके करपून गेली आहेत. तसेच वाडीवस्तीवरील सात तासांहून अधिक काळ वीज खंडित राहत असल्याने घरगुती ग्राहकांचे व दूध उत्पादनांचे नुकसान होत आहे. कृषी वाहिनीवरील अनावश्यक लोडशेडिंग तत्काळ बंद करून शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा द्यावा आणि वाडी वस्तीवरील घरगुती सिंगल फेज वीजपुरवठा सुरळीत करावा.
अन्यथा महावितरणाला मोठ्या आंदोलनाला सामना करावा लागेल असा संघटनेच्या माध्यमातून शेवटचा इशारा दिला. महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढून आंदोलनादरम्यान होणाऱ्या परिस्थितीला जबाबदार महावितरण प्रशासन राहील असा गर्भित इशारा ही देण्यात आला. सुमारे दोन तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर कार्यकारी अभियंता भीमराव म्हस्के यांनी आठवड्याभराच्या तोंडी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक तालुकाध्यक्ष विजय देवकर, युवक शहराध्यक्ष सतीश पवार, खटाव-माण विधानसभा संघटक संतोष तुपे, युवक तालुकाध्यक्ष विजय देवकर, स्वाभिमानी आजी-माजी सैनिक संघटना अध्यक्ष सतीश जाधव, शहराध्यक्ष महेंद्र गोडसे, उपाध्यक्ष संतोष पंडित, पोपट पवार, रामचंद्र इंगळे, जिल्हा संघटक शंकरराव देशमुख उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
२००१ पूर्वी नियुक्त शिक्षकांनाही पदोन्नतीसाठी ‘टीईटी’ अनिवार्य; हायकोर्टाचा निर्णय, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार
पुढील बातमी
आहिर-तापोळा केबल स्टे ब्रीजवरून प्रवास करताना खबरदारी घ्या, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांचे आवाहन

संबंधित बातम्या