मुंबई : देशभरात झालेल्या जेन झींच्या आंदोलनाबद्दल भाष्य करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आमची आणीबाणी लागू करून सरकार चालवण्याची संस्कृती नाही, असे उत्तर दिले. अमित शाह यांची मुंबईत पत्रकार परिषद झाली, यावेळी त्यांना विद्यार्थी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
१७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आता देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सेवेला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने भाजपा प्रणित एनडीए आघाडीकडून सेवा संकल्प अभियान देशभरात आयोजित केले जाणार आहे.
या अभियानाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माहिती दिली. अमित शाह म्हणाले की, मोदीजी आधी गुजरातमध्ये असताना त्यांचा जन्मदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करायचे. या देशात खूप कमी नेते आहेत, ज्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून सलग २५ वर्षे सेवा करण्याचा विक्रम केला आहे. यानिमित्ताने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या काळात देशभरात सेवा संकल्प अभियान आयोजित केले जाणार आहे, अशी माहिती शाह यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल प्रश्न, अमित शाहांनी काय दिले उत्तर?
जेव्हा कुठले आंदोलन होते, तेव्हा त्याचे वेगवेगळे परिणाम बघायला मिळतात. काही महिन्यांपूर्वी जेन झींचे देशभरात एक आंदोलन झाले. त्याचे भारतात सामाजिक आणि राजकीय काय परिणाम बघायला मिळत आहेत. तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला होता.
उत्तर देताना अमित शाह म्हणाले, "बघा आपण लोकशाहीमध्ये आहोत. काही विषयांवर लोकांचे एक मत असते. आणि ते मांडणे हेही गरजेचे आहे. भाजपाचे सरकार.. आम्ही आणीबाणी लागू करून सरकार चालवू शकत नाही. ती काँग्रेसची संस्कृती आहे. आमची वेगळी संस्कृती आहे. आम्ही संवाद करतो. चर्चा करतो", असे भाष्य अमित शाह यांनी केले.
बांगलादेशी घुसखोरांच्या मुद्द्याव विचारलेल्या प्रश्नावर अमित शाह म्हणाले की, "आम्ही प्रत्येक घुसखोराला शोधून शोधून देशाच्या बाहेर काढू", असेही ते म्हणाले. अमित शाह यांनी नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात घेण्यात आलेल्या महत्त्वाच्या आणि निर्णायक निर्णयांची माहिती दिली.
'आणीबाणी लागू करून सरकार चालवणे आमची संस्कृती नाही', अमित शाहांचे 'जेन झी आंदोलना'वर बोलताना विधान, मुंबईत पत्रकार परिषद
by Team Satara Today | published on : 13 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा