गौरी-गणपतीच्या खरेदीला साताऱ्यात वेग

सजावटीचे साहित्य, फुलांच्या माळा, मखरांसह गौरीच्या साजशृंगारासाठी बाजारपेठेत नागरिकांची लगबग

by Team Satara Today | published on : 12 September 2026


सातारा : गणेशोत्सवाची चाहूल लागल्याने सातारा शहरातील बाजारपेठेत सणाच्या खरेदीला चांगलाच वेग आला आहे. गणरायाच्या आगमनासोबतच गौरीपूजनाची तयारीही सुरू झाल्याने घराघरांतील महिला आणि कुटुंबीय विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहेत. त्यामुळे मोती चौक, राजवाडा, पाचशे एक पाटी परिसरासह प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर गर्दीचे चित्र दिसत आहे.
गणपतीच्या सजावटीसाठी यंदा विविध प्रकारची मखरे, रंगीबेरंगी पडदे, कृत्रिम फुले, तोरणे, मोत्यांच्या माळा, झुंबर, आकर्षक लाईटिंग, विद्युत माळा आणि विविध सजावटीच्या वस्तू बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. पारंपरिक सजावटीसोबतच घरातील उपलब्ध जागेनुसार लहान आकारातील मखरांना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
गौरी आगमनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीलाही महिलांची विशेष पसंती दिसून येत आहे. गौरीचे मुखवटे, साड्या, दागिने, गजरे, हार, फुलांच्या माळा, सजावटीचे दागिने तसेच पूजेसाठी लागणारे साहित्य विविध दुकानांमध्ये मांडण्यात आले आहे. आपल्या घरातील गौरीची सजावट आकर्षक दिसावी यासाठी महिला विविध वस्तूंची पाहणी करून खरेदी करताना दिसत आहेत.
यंदा सजावटीच्या साहित्यामध्ये विविधता वाढली असून पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या वस्तूंना मागणी आहे. रेडिमेड सजावटीचे संच, तयार तोरणे आणि आकर्षक मखरांमुळे ग्राहकांचा वेळही वाचत आहे. गणेशोत्सवाच्या दिवसांत घराची सजावट करण्यासाठी आवश्यक बहुतांश साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
सणासाठी आवश्यक खरेदी करण्यासाठी नागरिक संध्याकाळच्या वेळेत मोठ्या संख्येने बाहेर पडत असल्याने प्रमुख रस्त्यांवरही वर्दळ वाढली आहे. पुढील काही दिवसांत गणेशमूर्तींच्या आगमनासह बाजारातील गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच गौरी-गणपतीच्या स्वागतासाठी सातारा शहराची बाजारपेठ सणाच्या रंगात रंगू लागली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सातार्‍यातील वाहतुकीत बदल
पुढील बातमी
अजिंक्यतारा कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

संबंधित बातम्या