सातारा : जनावरांना चारा-पाण्याची व्यवस्था न करता आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून सात जनावरांची वाहतूक करणार्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली. शिंदेवाडी (ता. खंडाळा) येथे झालेल्या कारवाईत आयशर ट्रक व जनावरे असा 8 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सातारा-पुणे महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर हॉटेल किनारासमोर दि. 10 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास पोलिसांनी ट्रकची तपासणी केली. त्यावेळी वाहनात चार रेडे आणि तीन म्हशी आढळून आल्या.
वाहतुकीदरम्यान जनावरांसाठी पुरेसा चारा व पाण्याची सोय करण्यात आली नव्हती. पायाखाली मॅटऐवजी भुसा टाकण्यात आला होता. तसेच जनावरे चढ-उतार करण्यासाठी रॅम्पची व्यवस्था नव्हती. वाहनावर ऍनिमल कॅरिअर’ असा फलकही लावलेला नव्हता. ट्रकचा हौदा ताडपत्रीने पूर्ण झाकण्यात आला होता.
दीपक पालेपवाड यांच्या फिर्यादीवरून अकबर हुसेन शेख, जैद वाहिद कुरेशी आणि अरबाज अल्ताफ कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास धुमाळ करीत आहेत.
अवैधरित्या जनावरांच्या वाहतूक प्रकरणी शिंदेवाडी येथे ट्रकसह 8.45 लाखांचा मुद्देमाल जप्त
by Team Satara Today | published on : 11 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा