‘शिवसागर’ जलाशयात सांबर मादी चिमुकल्या अवखळ पिलासह लीलया पोहतानाचे दृश्य समोर; चित्रफीत समाज माध्यमांवर

by Team Satara Today | published on : 11 September 2026



सातारा : महाराष्ट्राची जीवनदायिनी मानले जाणारे कोयना धरण यंदा १०० टक्के भरले असून, या तुडुंब भरलेल्या ‘शिवसागर’ जलाशयातील निसर्गसौंदर्याचा आनंद मानवाप्रमाणेच वन्यजीवही लुटताना दिसत आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या घनदाट संवेदनशील क्षेत्रात (कोअर झोन) मध्ये असलेल्या ऐतिहासिक वासोटा किल्ल्याच्या पायथ्याशी, कोयनेच्या संथ निळ्याशार पाण्यात एक सांबर मादी आपल्या चिमुकल्या अवखळ पिलासह लीलया पोहतानाचे दुर्मिळ व आकर्षक दृश्य समोर आले आहे.
जैवविविधतेने समृद्ध सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जागतिक वारसा स्थळ असलेल्या सह्याद्रीच्या कुशीतील हा परिसर वन्यजीवांसाठी अत्यंत सुरक्षित अधिवास मानला जातो. या घनदाट जंगलात राजेशाही पट्टेरी वाघ आणि बिबट्यांचा मुक्त वावर असून, हिरव्यागार डोंगरांवर बागडणारे गव्यांचे भलेमोठे कळप, शेकरू, भेकर, पिसोरी, अस्वल, चौशिंगा, खवलेमांजर, रानडुक्कर आणि रानकुत्रे यांसारख्या विविध प्राण्यांची आणि विविध पक्षांची मोठी संख्या आहे. सध्या वन्यजीवांचा विणीचा हंगाम सुरू असल्याने जंगल परिसरात वन्यजीवांच्या हालचाली वाढल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, नवजा आणि कोयनानगर परिसरातील धबधबे फेसाळत वाहत असून, अथांग जलाशयाच्या काठावर वन्यजीवांसाठी चराऊ कुरणे व मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालेला दुर्मिळ क्षण वासोटा परिसरात बोटिंग करणाऱ्या पर्यटकांच्या नजरेस सांबरांच्या पोहण्याचे हे दृश्य पडले. जलाशयात सांबर मादी आपल्या पिलाला सोबत घेऊन मैलोनमैल पोहत जात होती. पर्यटकांनी हा सुंदर आणि भावुक क्षण कॅमेऱ्यात कैद केला असून, निसर्गाच्या या अनमोल नजराण्याची चित्रफीत सध्या समाज माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आमदार रोहित पवार यांचे कोथरूडमध्ये आंदोलन; आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी
पुढील बातमी
ना. मकरंद पाटील यांच्या मुलासह 10 ते 15 जणांवर मारहाण, जबरी चोरीचा आरोप; ऍड. शाहिद इनामदार यांची पोलिसांत तक्रार

संबंधित बातम्या