गणेशोत्सवात भाविकांना प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

by Team Satara Today | published on : 11 September 2026


पुणे : गणेशोत्सवात गणेश मंडळांकडून भाविकांना अन्नदान, प्रसादवाटप करण्यात येते. मात्र, या मंडळांना त्‍यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) यंदा नोंदणी करावी लागणार आहे. दरम्यान, या प्रक्रियेविषयी मंडळे देखील संभ्रमावस्थेत आहेत.
गणेशोत्सव काळात गणेश मंडळांचा प्रसाद व अन्नवाटप पूर्णपणे स्वच्छ आणि सुरक्षित असावे, यासाठी काही दिवसांपूर्वी ‘एफडीए’ने नवी नियमावली जारी केली. त्‍याबाबत ‘एफडीए’ने याविषयी प्रसिद्धीपत्रक काढले आहे. यामध्ये मंडळांसाठी नोंदणीप्रक्रिया अपरिहार्य आहे. मात्र, ही नोंदणी कोणी, कशी करायची याचे निकष काय, याविषयी मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
या दहा दिवसांच्या उत्सवात बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पुणे विभागाने विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके गणेश मंडळांच्या महाप्रसाद व अन्नवाटपाच्या दर्जाची प्रत्यक्ष पाहणी करतील. त्याचप्रमाणे अन्न तयार करताना होणारी अस्वच्छता किंवा घाण यावरही या पथकांची नजर असणार आहे. जी गणपती मंडळे अन्नदान करणार आहेत, त्यांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी १२ महिन्यांसाठी, तीन महिन्यांसाठी अथवा गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीसाठीही घेता येईल. तीन महिने आणि दहा दिवसांसाठी नोंदणीशुल्क शंभर रुपये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती ‘एफडीए’चे सह आयुक्त दिगांबर भोगावडे यांनी दिली.
मंडळांना नोंदणीसाठी ‘वेब लिंक’
अन्नवाटप आणि प्रसादवाटप करणारी मंडळे या नव्या नियमांवरून संभ्रमावस्थेत आहेत. प्रशासनाने नोंदणीसाठी https://foscos.fssai.gov.in/apply-for-lic-and-reg ही लिंक दिली असून, यावर मंडळांनी आपली सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गणेशोत्सवात विघ्न येणार नाही, मात्र सरकारने 'विघ्न' बनू नये; मुंबई आंदोलनावरून मनोज जरांगेंचा इशारा
पुढील बातमी
आमदार रोहित पवार यांचे कोथरूडमध्ये आंदोलन; आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

संबंधित बातम्या