मुंबई : रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह करण्यासाठी ‘नशामुक्त चालक, सुरक्षित प्रवास, सक्षम महाराष्ट्र’ या संकल्पनेवर आधारित ‘नशामुक्त एसटी महामंडळ’ अभियान राबविण्यात येत आहे. सन २०२६ ते २०२९ या कालावधीत राज्यव्यापी मद्य व अमली पदार्थ तपासणीअंतर्गत विविध प्रकारच्या प्रवासी व मालवाहतूक सेवांमध्ये एकात्मिक तपासणी व्यवस्था लागू करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती व मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
मंत्रालयात नशामुक्त एसटी महामंडळ अभियानासंदर्भात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस एसटी महामंडळ तसेच परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रस्तावित ‘नशामुक्त एसटी महामंडळ’ अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, महानगरपालिका बससेवा, शासकीय वाहने, सार्वजनिक उपक्रम तसेच शासनासाठी कार्यरत कंत्राटी वाहनांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खासगी बस, पर्यटन वाहने, टॅक्सी, ॲपआधारित कॅब, ऑटोरिक्षा आणि कंत्राटी प्रवासी वाहतूक सेवांमध्येही तपासणी व्यवस्था लागू करण्याचे नियोजन असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
१ लाख रूपयांची देणगी, तपासणी मशीन खरेदी करण्यात येणार
या अभियानाच्या माध्यमातून नशेच्या प्रभावाखाली वाहन चालविण्यास प्रतिबंध करण्यासोबतच जनजागृती, नियमित तपासणी, प्रतिबंधात्मक उपाय, उपचार व पुनर्वसन यांचा समन्वय साधण्यात येणार आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या उद्दिष्टपूर्तीसाठी सुरक्षित आणि सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून या ‘नशामुक्त एसटी’ या मोहिमेच्या माध्यमातून चालक आणि वाहकांच्या ड्रग सेवन तपासणीसाठी १ लाख रूपयांची देणगी देऊन त्याद्वारे तपासणी मशीन खरेदी करण्यात येणार असल्याचे मंत्री सरनाईक यांनी जाहीर केले.
- तपासणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, प्रमाणित उपकरणे आणि डिजिटल नोंदव्यवस्था विकसित करण्यावरही भर देण्यात येणार आहे.
- वाहतूक सेवेचे स्वरूप आणि जोखीम लक्षात घेऊन कर्तव्यपूर्व मद्य तपासणी, नियोजित तसेच आकस्मिक अंमली पदार्थ तपासणी आणि विशिष्ट घटना अथवा वाजवी संशयाच्या परिस्थितीत तपासणी करण्यासाठी स्पष्ट कार्यपद्धती निश्चित केली जाणार आहे.
आता ‘नशामुक्त एसटी महामंडळ’ अभियान राबवले जाणार - प्रताप सरनाईक यांची माहिती, अभियानासंदर्भात विशेष बैठकीत निर्णय
by Team Satara Today | published on : 11 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा