अमरावती : अमरावती शहराची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या जयस्तंभ-राजकमल रेल्वे उड्डाणपुलाचे काम आगामी ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. या उड्डाणपुलासाठी १३० कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला असून, वर्षभरात हे काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी येथे केली.
अमरावती दौऱ्यावर असताना मंत्री भोसले यांनी आज थेट जयस्तंभ-राजकमल उड्डाणपुलाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाचा सविस्तर आढावा घेतला. हा पूल शिकस्त (धोकादायक) झाल्याने गेल्या वर्षी २४ ऑगस्ट २०२५ रोजी रात्रीपासून यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करून तो पाडण्यात आला होता. त्यानंतर वर्षभर या पुलाचे काम रखडल्याने अमरावतीकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता या पुलाच्या कामातील सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून, कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी प्रवीण पोटे पाटील, संजय खोडके, प्रताप अडसड, राजेश वानखडे, प्रवीण तायडे या आमदारांसह महापौर श्रीचंद तेजवानी, शिवराय कुळकर्णी, जयंत डेहनकर, किरण पातूरकर, तुषार भारतीय, चेतन गावंडे, चेतन पवार यासह ‘बीॲन्डसी’चे अधिकारी
उपस्थित होते.
स्त्री रुग्णालय आग दुर्घटना: दोषींना पाठीशी घालणार नाही!
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात घडलेल्या भीषण आग दुर्घटनेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विंगने फायर ऑडिटकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप होत आहे. यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. ही अत्यंत दुर्दैवी घटना असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. चौकशी समितीचा अहवाल प्राप्त होताच, ज्यांनी कामात कसुराई केली असेल किंवा दुर्लक्ष केले असेल, त्या दोषींवर १०० टक्के कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री भोसले यांनी दिले.
अमरावतीत रखडलेला जयस्तंभ-राजकमल उड्डाणपूल वर्षभरात वाहतुकीसाठी खुला केला जाईल - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उड्डाणपुलाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी
by Team Satara Today | published on : 11 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा