सातारा : पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे गावात बदनामी झाल्याच्या नैराश्यातून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना माण तालुक्यातील एका गावात बुधवारी (दि. ९) दुपारी साडेबारा वाजता घडल्याचे समोर आले. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाणे, दहिवडी येथे पत्नीसह तिच्या प्रियकरावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांनाही अटक केली.
याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आत्महत्या केलेला पीडित पती ४० वर्षांचा होता. त्याच्या पत्नीचे एका तरुणासोबत विवाहबाह्य संबंध होते. दोघांना समजावून सांगूनही पत्नी व तिचा प्रियकर ऐकत नव्हते. या संबंधामुळे संपूर्ण गावात बदनामी झाली. यामुळे पती नेहमी नैराश्यात असायचा. दरम्यान, बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याने गावाजवळीलच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दहिवडी पोलिसांना याची माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. संबंधित तरुणाच्या वडिलांनी सून आणि तिच्या प्रियकराविरोधात मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तातडीने अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी हे अधिक तपास करत आहेत.
‘तो’ मनातून पूर्णपणे खचला होता
आत्महत्या केलेल्या पतीची त्याचे मित्र व नातेवाइकांनी समजूत काढली होती. गावात बदनामी झाली असली तरी आपला संसार महत्त्वाचा आहे, हे त्याला सातत्याने पटवून दिले जात होते. परंतु तो तात्पुरता 'होय' म्हणून ऐकून घ्यायचा. परंतु मनातून तो पूर्णपणे खचला होता, असे पोलिसांनी सांगितले.
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे गावात बदनामी झाल्याच्या नैराश्यातून पतीने संपविले जीवन; माण तालुक्यातील घटना, पत्नीसह प्रियकरास अटक
by Team Satara Today | published on : 11 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा