शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता देण्याच्या कारणावरून मारहाणप्रकरणी कोरेगाव तालुक्यातील आठ जणांना तीन वर्षांची शिक्षा

by Team Satara Today | published on : 11 September 2026


कोरेगाव : शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता देण्याच्या कारणावरून झालेल्या वादात शेतमालकासह त्याच्या कुटुंबीयांना लोखंडी गज, तलवार, कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी सात जणांना तीन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
राजेंद्र मुरलीधर भोसले, कुमार मुरलीधर भोसले, अमोल कुमार भोसले, तानाजी मुरलीधर भोसले, सागर राजेंद्र भोसले, सुरज तानाजी भोसले व अमित मारुती भोसले, संदीप ज्ञानदेव भोसले (सर्व रा. आझादपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा) व नंदकुमार संतोष शिरतोडे (रा. बोरजाईवाडी, ता. कोरेगाव, जि. सातारा) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी फिर्यादी संकेत अरुण बाबर, रा. आझादपूर, ता. कोरेगाव, जि. सातारा यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यात ३० एप्रिल २०२० रोजी फिर्याद दिली होती. आझादपूर हद्दीतील शिव नावाच्या शिवारातील गट क्रमांक १५९ मधील शेतजमिनीत जाण्यासाठी रस्ता देण्यावरून हा वाद झाला होता. रस्ता शेतमाल वाहतुकीसाठी खुला करण्याबाबत तलाठी व मंडल अधिकारी यांनी पाहणी करून संबंधित रस्ता वाहतुकीस खुला करण्याची सूचना दिली होती.
त्यानंतर २९ एप्रिल २०२० रोजी रात्री साडेआठ वाजता फिर्यादी व साक्षीदार घरासमोर गप्पा मारत असताना आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी संकेत बाबर तसेच अक्षय बाबर, सुरज बाबर व अन्य व्यक्तींना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक विशाल ए. कदम यांनी केला. त्यांना पोलिस कॉन्स्टेबल अमोल कणसे यांनी मदत केली. हा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांच्या कोर्टात चालला होता.
सरकारतर्फे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा सरकारी अभियंता सुरेखा क्षीरसागर यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. या केसमध्ये दहा साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा तसेच अन्य साक्षीदारांच्या साक्षीवरून व जिल्हा सरकारी वकिलांचा युक्तिवाद व आरोपींनी केलेल्या कृत्याबाबत न्यायालयात सादर करण्यात आलेला पुरावा ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी आठ जणांना शिक्षा सुनावली.
जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री तेरणी, कोरेगावचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात भैरवी अधिकारी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल विकास आव्हाड यांनी कामकाज पाहिले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उपोषणाला बसू नका असे सांगू शकत नाही, आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार; मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर हायकोर्टाचे स्पष्टीकरण
पुढील बातमी
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे गावात बदनामी झाल्याच्या नैराश्यातून पतीने संपविले जीवन; माण तालुक्यातील घटना, पत्नीसह प्रियकरास अटक

संबंधित बातम्या