विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सर्व प्रक्रिया कालबद्ध व पारदर्शकपणे पूर्ण करा - विभागीय आयुक्त शितल तेली-उगले, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

by Team Satara Today | published on : 10 September 2026


सातारा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) अंतर्गत ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती स्वीकारून निर्गमित करण्यासाठी मुदत निश्चित करण्यात आली आहे. सर्व प्रक्रिया कालबद्ध व पारदर्शकपणे पूर्ण करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR-2026) संदर्भात विभागीय आयुक्त श्रीमती तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इमनामदार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी सर्व तहसीलदार उपस्थित होते.
व्हीआयपी' मतदारांची यादी विधानसभा मतदारसंघनिहाय एकत्र तयार ठेवावी, अशा सूचना करुन विभागीय आयुक्त श्रीमती तेली-उगले म्हणाल्या, प्राप्त होणाऱ्या दावे व हरकतींच्या अर्जांसाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्यांच्या निर्गतीचा आराखडा सादर करण्यात यावा. सर्व अर्ज ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार आदेशाद्वारे निकाली काढून त्याचे इतिवृत्त तयार करावे. दावे आणि हरकतींचे अर्ज हे थेट मतदारांकडूनच प्राप्त होतील याची विशेष दक्षता घेण्यात यावी. कोणत्याही राजकीय पक्षाकडून अथवा प्रतिनिधीकडून गठ्ठा स्वरूपात अर्ज स्वीकारु नयेत.
ज्या मतदारांच्या नोंदींमध्ये त्रुटी आहेत किंवा मॅपिंग झालेले नाही आणि नोटीस देऊनही ते सुनावणीस उपस्थित राहिलेले नाहीत, त्यांना प्रक्रियेनुसार दुसरी नोटीस बजावून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दररोज एका बीएलओ कडे सुनावणी घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे आणि त्याचा अहवाल तसेच नियोजित कार्यक्रम मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना सादर करावा. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी सुनावणीच्या ठिकाणी अचानक भेटी देऊन कामकाजाची पाहणी करावी. तसेच कागदपत्रांची छाननी व सुनावणीची प्रक्रिया शक्यतो मतदान केंद्रांच्या ठिकाणीच आयोजित करावी, जेणेकरून मतदारांना दूर जावे लागणार नाही. तसेच तरुणांच्या मतदार नोंदणीवर भर देताना १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे नोंदवण्यासाठी सर्व महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करावे अशा सूचनाही विभागीय आयुक्त श्रीमती तेली-उगले यांनी दिल्या.
या बैठकीनंतर विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचीही बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील पुनरीक्षण कामाची सविस्तर माहिती राजकीय पक्षांना देण्यात आली. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत नागरिकांनी आपले नाव तपासून घ्यावे, असे आवाहन यावेळी केले.
ज्या मतदारांची नावे 'एएसडीडी' (ASDD) यादीत आहेत परंतु अन्यत्र कोठेही समाविष्ट नाहीत, त्यांनी आवश्यक पुराव्यांसह मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करावेत. त्रुटी किंवा मॅपिंग न झालेल्या मतदारांना सुनावणीसाठी नोटिसा दिल्या जाणार असून त्यांनी योग्य पुराव्यांसह उपस्थित राहावे, याची कल्पना राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. तसेच १८ वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरांबाबत राजकीय पक्षांनीही आपल्या स्तरावरून जनजागृती करावी, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी श्रीमती तेली-उगले यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाडळीत बंद घर फोडून ४९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास
पुढील बातमी
रमाई आवास योजनेतील उर्वरित घरे डिसेंबरपर्यंत पूर्ण करा - जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत घेतला योजनेचा आढावा

संबंधित बातम्या