गणेशोत्सवात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी घाला; साताऱ्यात गुरुकुल सेकंडरी स्कूलच्या ६०० हून अधिक विद्यार्थ्यांची भव्य मानवी साखळी

by Team Satara Today | published on : 10 September 2026


सातारा : गणेशोत्सव २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरात होणारा डीजे साऊंड सिस्टिमचा प्रचंड आवाज आणि घातक लेझर लाईट बीमचा वापर रोखण्यासाठी गुरुवारी सातारा शहरात गुरुकुल सेकंडरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून भव्य मानवी साखळी व जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार पडलेल्या या उपक्रमात ६०० ते ७०० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून डीजे व लेझर लाईटमुक्त गणेशोत्सवाचा ठाम संदेश दिला.
गुरुकुल सेकंडरी स्कूलचे चेअरमन. राजेंद्र चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली १० सप्टेंबर रोजी सकाळी १०:१५ ते ११:१५ या वेळेत ही मानवी साखळी उभारण्यात आली. गोलबाग राजवाडा येथून सुरू झालेली ही साखळी मोती चौक, देवी चौक ते कमानी हौद या मुख्य मार्गाच्या दोन्ही बाजूला शिस्तबद्ध पद्धतीने उभी होती. हातात “डीजे साऊंड सिस्टीम बंद करा”, “लेझर लाईट बंद करा” अशा आवाहनांचे फलक धरून विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीचा समारोप सातारा तालीम संघ येथे झाला.
आरोग्यावर होणारे घातक परिणाम व नियमांचे उल्लंघन: गणेशोत्सव काळात साऊंड सिस्टिम आणि लेझर लाईटच्या अतिवापरामुळे ध्वनी व प्रकाश प्रदूषणात मोठी वाढ होते. या उच्च क्षमतेच्या आवाजाचा आणि तीव्र किरणांचा सर्वाधिक त्रास लहान बालके, ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, रुग्ण तसेच पशुपक्ष्यांना सहन करावा लागतो. सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशानुसार रात्री १०.०० वाजेनंतर लाऊडस्पीकर वाजवण्यावर बंदी असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे पालन होत नाही. हे नियम पाळले जावेत आणि ध्वनी-प्रकाश प्रदूषण तात्काळ बंद व्हावे, यासाठी गुरुकुल विद्यालयाने या उपक्रमाद्वारे समाजमन प्रबोधित करण्याचा प्रयत्न केला.
या उपक्रमाचे सातारा शहर व परिसरातील नागरिकांमधून मोठे कौतुक होत असून, यंदाच्या गणेशोत्सवात सर्व गणेश मंडळांनी डीजे आणि लेझर लाईटचा वापर टाळून पारंपरिक व पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्येष्ठ पत्रकार, सहकार आणि संत साहित्याचे अभ्यासक मधुसूदन नेने (मधु नेने) यांचे निधन
पुढील बातमी
गुणवत्तेच्या कसोटीवर साताऱ्याच्या शाळा; जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विविध विभागांनी केले कामकाजाचे सादरीकरण

संबंधित बातम्या