सातारा : स्वातंत्र्य चळवळीच्या काळात क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारा जिल्हा कारागृहाच्या तटावरून घेतलेली उडी हा इतिहासातील महत्त्वाचा प्रसंग आहे. या घटनेला ८२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृह परिसरातील स्मृतीस्तंभास अभिवादन करण्यात आले. नव्या पिढीने या इतिहासाचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी स्मारक समितीचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी केले.
यावेळी कारागृह अधीक्षक ब्रह्मदेव लुटपुटे, सातारा शहर पोलिस ठाण्याचे प्रमुख सचिन म्हेत्रे, बाळासाहेब नायकवडी, युवा नेते वीरधवल नायकवडी, अजित वाजे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसदारांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
स्मृतीस्तंभास वैभव नायकवडी व मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. डॉ. नागनाथअण्णा यांच्या प्रतिमेचे पूजनही करण्यात आले. साखर कामगार संघटनेचे सांगली जिल्हा सचिव शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले.
नायकवडी म्हणाले, ‘‘१९४२ ते १९४४ या काळात स्वातंत्र्य चळवळीला वेग आला होता. नागनाथअण्णांनी सशस्त्र क्रांतिकारी चळवळीत सहभाग घेतला. ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सातारा कारागृहातून उडी घेतल्यानंतर त्यांच्या कार्याला नवा टप्पा मिळाला.’’
बाळासाहेब नायकवडी यांनी या घटनेचा स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाच्या दृष्टीने अभ्यास होण्याची गरज व्यक्त केली. ‘‘अनेकांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला. त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे,’’ असे त्यांनी सांगितले.
लुटपुटे आणि म्हेत्रे यांनीही नागनाथअण्णा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा उल्लेख केला.
कार्यक्रमास प्रमोद परमने, शंकर पाटील, विजय निकम, शामराव चिंचणे, असलम तडसरकर, गौतम भोसले, डी. बी. जाधव, शंकर माळवदे, संपत जाधव आदी उपस्थित होते. विजय मांडके यांनी आभार मानले.
क्रांतिवीर नागनाथअण्णांच्या उडीचा इतिहास नव्या पिढीने जाणून घ्यावा - वैभव नायकवडी यांचे साताऱ्यात आवाहन, जिल्हा कारागृह परिसरातील स्मृतीस्तंभास अभिवादन
by Team Satara Today | published on : 10 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा