संपूर्ण महाराष्ट्रातच डीजे,लेझर लाईटला बंदी घाला; साताऱ्यातील २० ज्येष्ठ नागरिक संघ व इतर सामाजिक संस्थांची मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवून मागणी

by Team Satara Today | published on : 10 September 2026


सातारा : शहरात दरवर्षी गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत डीजे दणाणतो. या वर्षीही हीच परिस्थिती निर्माण होण्याची धास्ती असल्याने अनेक ज्येष्ठ मंडळींनी सातारा शहर तात्पुरते सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे साताऱ्यातील २० ज्येष्ठ नागरिक संघ व इतर सामाजिक संस्थांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून महाराष्ट्रात सर्वच उत्सव आणि खासगी कार्यक्रमात डीजे व लेझर लाइटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
सातारा शहरातून राजवाडा ते कमानी हौद आणि पुन्हा शेटे चौक ते मोती चौक, प्रतापगंज पेठ, राधिका चौक ते बुधवार नाका असा विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आहे. या मार्गावर राहणारे ज्येष्ठ नागरिक डीजेच्या धास्तीने आत्तापासून भयभीत झाले आहेत. डीजे दणाणण्याचा दर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्याने या वर्षीही डीजेची धास्ती त्यांना मनात दाटली आहे.
त्यामुळे या परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विसर्जन मिरवणुकीवेळी सातारा शहरात न थांबण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काहींची हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे डीजेच्या आवाजाने पुन्हा त्रास होऊ नये, यासाठी कोणी पाहुण्यांकडे, तर कोणी शहराबाहेरील लॉजवर राहण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ मंडळींवर अशा प्रकारची वेळ येत असल्याने उत्सवाचा आनंद कसा घ्यायचा? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातच बंदी घाला
साताऱ्यातील डीजेविरोधी आंदोलनाचे समन्वयक प्रसाद चाफेकर यांनी सातारा शहरातील २० हून अधिक ज्येष्ठ नागरिक संघ व इतर सामाजिक संस्थांना एकत्र करत डीजेविरोधी आंदोलन वर्षभरापूर्वीच सुरू केले आहे. डीजेविरोधात भर पावसातही आंदोलकांनी मोर्चा काढला होता. आता तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून संपूर्ण महाराष्ट्रात डीजे आणि लेझर लाईटला बंदी घालण्याची मागणी केली आहे.
डीजे वाजण्यापूर्वीच कारवाई करा
सातारा शहरात दहीहंडी कार्यक्रमात डीजे दणाणल्याप्रकरणी आत्तापर्यंत एकूण दोन गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये पंधरा जणांचा समावेश आहे. सातारा पोलिसांनी डीजेविरोधात कारवाई सुरू केली आहे. परंतु, डीजे वाजल्यानंतर कारवाई नको; तत्पूर्वीच करा, अशी भूमिका ज्येष्ठांची आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खराब धान्य आरोग्यासाठी धोकादायक : नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कडक कारवाई, दुकानांनाही 'एफएसएसआय' परवाना सक्तीचा
पुढील बातमी
वीज कंपन्यांचे खासगीकरण नाही! रोखलेला बोनस देणार; कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दिलासा

संबंधित बातम्या