सातारा : राजवाडा गांधी मैदान येथे आयोजित दहीहंडी कार्यक्रमात मोठ्या आवाजात डीजे वाजविणे, पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणे आणि स्टेजवर जाण्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी झाल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी आयोजक, डीजे मालक-चालक व अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमासाठी सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने स्टेज उभारण्यात आला होता. तसेच पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून मोठ्या आवाजात डीजे वाजविण्यात आला. स्टेजवर क्षमतेपेक्षा अधिक लोक चढल्याने वाद निर्माण झाला. त्यानंतर दोन गटांतील व्यक्तींनी एकमेकांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
याप्रकरणी पोलीस हवालदार दीपक पोळ यांनी फिर्याद दिली. यश सावंत, मयूर जाधव, सौरभ खरात, धीरज शेळके, संग्राम दनाने, तुषार धोत्रे, अनिकेत पवार, अन्य १० ते १२ अनोळखी इसम तसेच डीजे मालक-चालक उदय बर्गे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार चमकले अधिक तपास करीत आहेत.
राजवाडा गांधी मैदान येथे दहीहंडीच्या जल्लोषाला गालबोट; डीजेप्रकरणी मालक-चालक व अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा
by Team Satara Today | published on : 09 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा