प्रतिसरकार स्मारकाच्या जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न? जेसीबी घेऊन आले; वैध कागदपत्रे दाखवता न आल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

by Team Satara Today | published on : 09 September 2026


सातारा : स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील साताऱ्याच्या प्रतिसरकार चळवळीचे स्मारक असलेल्या जागेवर अनधिकृतपणे ताबा मिळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व स्वातंत्र्य संग्राम विचारप्रेमी नागरिकांनी केला आहे. स्मारकाच्या जागेवर जेसीबीसह पाडकामाचे साहित्य आणून काम सुरू करण्याचा प्रयत्न झाल्याने संतप्त नागरिकांनी त्यास विरोध केला. संबंधितांकडे जागेवरील कामाची वैध कागदपत्रे मागितली असता ती दाखविता आली नसल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
प्रतिसरकार स्मारकासाठी आरक्षित असलेल्या या जागेचा वापर अन्य कारणांसाठी करण्याचा प्रयत्न यापूर्वीही झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या काळात स्मारक परिसराची भिंत तोडून पार्किंग करण्यात आल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. त्यानंतर आता राज्य परिवहन विभागाच्या वतीने या जागेवर तात्पुरते स्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बुधवारी (दि. ९) सकाळी १० ते १२ या वेळेत स्वातंत्र्य संग्राम विचारप्रेमी नागरिक व सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी उपस्थित होते. जेसीबीच्या सहाय्याने सुरू असलेल्या हालचालींना त्यांनी तीव्र विरोध केला. स्मारकाच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम अथवा तोडफोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
दरम्यान, प्रतिसरकार स्मारक प्रकल्पांतर्गत ज्येष्ठ संसद सदस्य शरदचंद्र पवार यांच्या निधीतून सामाजिक सभागृहासह पुढील नियोजित कामे प्रस्तावित असल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे स्मारकाची जागा सुरक्षित ठेवून प्रस्तावित प्रकल्पाला सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून स्मारकाच्या जागेवरील अनधिकृत हालचाली थांबवाव्यात आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुनिल काळेकर, महारुद्र तिकुंडे, गणेश अहीवळे, सचिन जाधव, विजय निकम, अस्लम तडसरकर, कैलास कुंभार व प्रशांत जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा मॉर्फ केलेला फोटो प्रसारित केल्याप्रकरणी कारवाईची भाजपची मागणी
पुढील बातमी
फटाक्यांच्या आतषबाजीत ड्रॅगनच्या देखाव्याला आग; नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा

संबंधित बातम्या