ऊसदराचा तिढा पेटणार; प्रतिटन किमान ३०० रुपयांची वाढ देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

by Team Satara Today | published on : 09 September 2026


सातारा : आगामी ऊस गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदराचा प्रश्न चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा विचार करून मागील हंगामाच्या अंतिम दरापेक्षा यंदा प्रतिटन किमान ३०० रुपयांची वाढ द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेने जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले असून, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत ऊस उत्पादकांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधले.  खते, बियाणे, मजुरी, डिझेल, सिंचन तसेच ऊस वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाशी सुसंगत आणि शेतकऱ्यांना परवडणारा दर निश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली.
ऊस गाळपानंतर १४ दिवसांत शेतकऱ्यांना बिल अदा न करणाऱ्या कारखान्यांकडून नियमानुसार १५ टक्के व्याजासह रक्कम वसूल करावी, अशी मागणीही संघटनेने केली. इथेनॉलसह साखर उद्योगातील उपपदार्थांपासून मिळणाऱ्या उत्पन्नात शेतकऱ्यांचा योग्य वाटा निश्चित करावा, असेही निवेदनात नमूद आहे.
गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी पहिली उचल व अंतिम ऊसदर जाहीर करावा. वजनातील तफावत, बेकायदेशीर कपात आणि वाहतूक खर्चातील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष तपासणी पथके नेमावीत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी अर्जुनभाऊ साळुंखे, मनोहर येवले, रमेश पिसाळ, राजू घाडगे, मोहन घाडगे, सुधाकर शितोळे, संदिप काळंगे, अमोल पवार, महादेव डोंगरे, जनार्दन आवारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ठाकरे सेनेचा साताऱ्यात ‘बूथ टू व्हिलेज’ फॉर्म्युला; जिल्हा बँक, ग्रामपंचायत निवडणुकांसाठी संघटनात्मक वाढविण्यासाठी वेग; मुंबईतील बैठकीत साताऱ्यावर विशेष लक्ष
पुढील बातमी
पोषणाला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न; ९ वा राष्ट्रीय पोषण माह-२०२६ सुरू

संबंधित बातम्या