'माझ्या भाषेचे निमित्त करून पळ काढू नका'; छ. संभाजीनगरच्या बैठकीत षड्यंत्र रचले, मनोज जरांगेंचा आरोप

by Team Satara Today | published on : 09 September 2026


वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आज, बुधवारी (दि. ९) बारावा दिवस आहे. उपोषणामुळे शारीरिक स्थिती अधिकच खालावल्याने बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जरांगे पाटील यांना पुन्हा सलाईन लावून उपचार सुरू करण्यात आले. उपचार सुरू असतानाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या शासकीय बैठकीवर घणाघाती आरोप केले. "संभाजीनगरच्या बैठकीत केवळ आमचे आंदोलन मोडीत काढण्याचे नियोजन आणि षड्यंत्र रचले गेले. तुम्ही सपशेल अपयशी ठरला आहात; हे सरकार आरक्षण देऊ शकत नाही हे एकदा स्पष्ट सांगा," अशा अत्यंत आक्रमक शब्दांत जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी घेतलेल्या बैठकीचा समाचार घेताना जरांगे म्हणाले, "मागण्या मान्य झाल्याचे सांगून बैठकांचे केवळ देखावे केले जात आहेत. मी दोन महिन्यांपासून जात प्रमाणपत्रे देण्याची मागणी करत आहे. रद्द झालेली चार प्रमाणपत्रे वैध करून देतो म्हणाले होते, त्याचे काय झाले? हैदराबाद गॅझेटच्या अधिकृत अंमलबजावणीचे काय झाले? आरक्षण आणि जात पडताळणीबाबत सरकार काहीच बोलायला तयार नाही. आम्ही सण-उत्सव पाहत नाही, तुम्ही थेट कामाचे बोला." मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोड बोलून मराठ्यांचा घात केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
'शिंदेंनी वेळीच शहाणे व्हावे, मराठ्यांच्या अंगावर मराठे घालू नका'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री संजय शिरसाट यांच्यावर थेट तोफ डागत जरांगे म्हणाले, "मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचे काम शिंदे आणि शिरसाट यांनी ठरवून केले आहे. छत्रपती संभाजीनगरात बसून दंगल घडवण्याचे नियोजन सुरू आहे का? एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांच्या अंगावर मराठे घालण्याचे पाप करू नये, अन्यथा या सगळ्याला केवळ शिंदेच जबाबदार राहतील. तुमच्या अंगावरचे ओरखडे अजून बुजलेले नाहीत, वेळीच शहाणे व्हा." आपण तीन वर्षे एकनाथ शिंदे यांच्याशी गोड बोललो, हे सत्ताधारी का सांगत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

हे देखील वाचा: छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयात उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार प्रसाद लाड यांनी घेतलेली उच्चस्तरीय बैठक व मराठवाड्यातील जात प्रमाणपत्रांच्या आकडेवारीचा सविस्तर आढावा नक्की वाचा.

'१२ तारखेनंतर मुंबईचा मार्ग मोकळा'
आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत राज्य सरकारला अंतिम इशारा देताना जरांगे म्हणाले, "आम्ही १२ सप्टेंबरपर्यंत सरकारला वेळ देत आहोत. या मुदतीत सरकारने प्रश्न सोडवला नाही, तर १२ तारखेनंतर आमचा मुंबईत येण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने मुंबईत येऊ आणि हक्काचे आरक्षण घेऊनच राहू."
आमदारांच्या दहशतीला भीक घालत नाही
"काही नेते गुंडगिरीच्या जोरावर आम्हाला धमकावत आहेत. मराठ्यांसाठी मरण आले तरी चालेल, आम्ही कोणाच्याही दबावाला घाबरत नाही. आंदोलनातून माघार घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही."
'मी जातवान कुणबी; भाषेचे निमित्त करू नका'
आपल्या भाषेवरून मंत्र्यांकडून दिल्या जाणाऱ्या सल्ल्यावर संताप व्यक्त करत जरांगे म्हणाले, "आता जरांगे यांची भाषा हे केवळ पळवाटा काढण्याचे निमित्त केले जात आहे. हे रडके लोक खरे सांगायला तयार नाहीत. मी जातवान कुणबी आहे. मराठा आणि ओबीसी या दोन्ही घटकांना समोरासमोर उभे करून सत्तेची पोळी भाजण्याचे काम राज्यकर्त्यांनी केले आहे." उदय सामंत आणि प्रसाद लाड यांच्या एका शब्दावर आपण सलाईन लावून उपचार सुरू केले, मात्र मागण्यांवर ठोस निर्णय झाल्याशिवाय उपोषण स्थगित होणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
'माझ्या भाषेचे निमित्त करून पळ काढू नका'; छ. संभाजीनगरच्या बैठकीत षड्यंत्र रचले, जरांगेंचा आरोप


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या ठिकाणांवर EDचा छापा; महाराष्ट्रासह १८ ठिकाणी एकाचवेळी कारवाई
पुढील बातमी
आता २५ दिवसांनी करता येणार गॅस सिलिंडरचे बुकिंग; बुकिंगवरील निर्बंध केंद्र सरकारने शिथिल केले, ग्रामीण ग्राहकांना मोठा दिलासा

संबंधित बातम्या