सातारा : ध्वनीप्रदूषणाची मर्यादा ही समाजातील सर्वांच्या आरोग्यासाठी निश्चित केलेली आहे. केवळ वयोवृद्धांनाच नाही, तर कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे तरुण पिढीच्याही ऐकण्याच्या क्षमतेवर कायमस्वरूपी दुष्परिणाम होतो. त्यामुळे सणाचा उत्साह टिकवताना नागरिकांच्या आरोग्याशी खेळ न करता आवाजाची मर्यादा पाळणे हेच सर्वांच्या हिताचे असल्याचे साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ठामपणे बजावले.
राज्यात सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे आणि डॉल्बीच्या आवाजावरून वातावरण चांगलेच तापले असताना, साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या विषयावर अत्यंत थेट आणि वास्तववादी भूमिका मांडली आहे. "मुद्दा मुळात डीजे किंवा डॉल्बीचा नसून, आवाजाच्या तीव्रतेचा आणि त्याच्या विहित मर्यादेचा आहे," असे स्पष्ट करत त्यांनी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना परखड शब्दांत आरसा दाखवला.
सध्या सुरू असलेल्या 'डीजे मुक्ती' किंवा 'डॉल्बी मुक्ती' या संकल्पनांवर बोट ठेवत त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली. डीजे म्हणजे डिस्को जॉकी, जो प्रत्यक्ष गाणी निवडणारा आणि वाजवणारा एक माणूस असतो; त्यामुळे डीजेवर बंदी आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरीकडे, डॉल्बी हे केवळ ध्वनीशी संबंधित एक तंत्रज्ञान (Technology) आहे. सर्वोच्च न्यायालयाने अशा कुठल्याही तंत्रज्ञानावर बंदी घातलेली नसून, केवळ आवाजाची मर्यादा पाळण्याचे कडक निर्देश दिले आहेत. त्यामुळे मुळात चुकीच्या शब्दांचे अवडंबर माजवून मूळ समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
मोठ्या आवाजाच्या दुष्परिणामांची जाणीव करून देताना पोलीस अधीक्षकांनी मंडळांना एक उपरोधिक आव्हान दिले. जर मंडळांना मोठ्या आवाजात डॉल्बी वाजवण्याची परवानगी हवीच असेल, तर त्यांनी एक प्रयोग करून दाखवावा. प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांनी आधी स्पीकरच्या अगदी समोर स्वतःच्या घरातील वृद्ध व्यक्तींना किंवा आजी-आजोबांना तासभर बसवावे; अध्यक्ष स्वतः अतिवरिष्ठ असतील तर त्यांनी स्वतः तिथे बसावे. त्यानंतरच आम्ही या आवाजाला परवानगी देण्याचा विचार करू, असा सणसणीत सल्ला त्यांनी दिला.
‘डॉल्बीला परवानगी पाहिजे तर डिजेसमोर आजी-आजोबांना बसवा’, पोलीस अधीक्षक पिंगळेंचा गणेश मंडळांना परखड सल्ला, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ न करता आवाजाची मर्यादा पाळा
by Team Satara Today | published on : 08 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा