एआय मॉर्फिंगवरून साताऱ्यात राजे समर्थक आक्रमक; शिवेंद्रसिंहराजेंचा फोटो नृत्य कार्यक्रमाशी जोडल्याचा आरोप; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

by Team Satara Today | published on : 08 September 2026


सातारा : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मॉर्फ करून ते साताऱ्यातील एका नृत्य कार्यक्रमाशी जोडल्याचा आरोप झाल्याने मंगळवारी साताऱ्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले. संबंधित छायाचित्रांचा प्रत्यक्ष कार्यक्रमाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करत राजे समर्थकांनी आक्रमक पवित्रा घेतला. नगराध्यक्ष अमोल मोहिते, भाजपचे गटनेते अविनाश कदम यांच्यासह समर्थकांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधित यूट्यूब चॅनेलविरोधात तक्रार दाखल केली.
संबंधित यूट्यूब चॅनेलवरून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे छायाचित्र कथितरीत्या संपादित करून समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमधील छायाचित्रे एकत्र करून त्यांना चुकीचा संदर्भ देण्यात आला असून, हा प्रकार राजकीय बदनामीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे. त्यामुळे संबंधित पोस्टची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या राजे समर्थकांनी पोलिस ठाण्यात जोरदार भूमिका मांडली. एआय किंवा फोटो एडिटिंग तंत्रज्ञानाचा गैरवापर करून एखाद्या व्यक्तीचे छायाचित्र चुकीच्या संदर्भात प्रसारित करणे गंभीर बाब असून, समाजमाध्यमांवर अशा प्रकारे बदनामी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
संबंधित प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध
भाजपचे गटनेते अविनाश कदम यांनी संबंधित प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील स्थान, छत्रपती घराण्याचा वारसा तसेच विकासकामांबाबतची त्यांची भूमिका सर्वश्रुत आहे. अशा व्यक्तीचे छायाचित्र चुकीच्या पद्धतीने प्रसारित करून बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याच्या चौकटीत धडा मिळाला पाहिजे, अशी भूमिका कदम यांनी मांडली.
पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली
दरम्यान, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून, संबंधित पोस्ट, छायाचित्रे आणि त्यामागील परिस्थितीची चौकशी सुरू केली आहे. एआयच्या माध्यमातून छायाचित्रात नेमका कोणता फेरफार करण्यात आला, पोस्ट कोणी तयार केली आणि ती समाजमाध्यमांवर कोणी प्रसारित केली, याचा तपास झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. दरम्यान, चुकीच्या अथवा मॉर्फ केलेल्या छायाचित्रांना पुढे प्रसारित न करता संबंधित समाजमाध्यम खात्यांना ‘रिपोर्ट’ आणि ‘ब्लॉक’ करण्याचे आवाहन राजे समर्थकांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजवाडा परिसरात ड्रॅगन पेटला; नागरिकांची पळापळ, सह्याद्रीचा राजा मित्र मंडळाच्या श्री आगमन मिरवणुकीत थरार
पुढील बातमी
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज : पांडुरंग बलकवडे. फाशीचा वड येथे अभिवादन. कार्यक्रमास खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थिती

संबंधित बातम्या