सातारा : दिव्यांगांसाठी अशासकीय संस्थांमार्फत सुरू असलेल्या विशेष अनुदानित उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांच्या अनुदानविषयक प्रस्तावांची पडताळणी करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी सातारा जिल्ह्यातील दोन दिव्यांग संस्थांना भेट देऊन तेथील शैक्षणिक, प्रशिक्षण व कौशल्य विकासाच्या उपक्रमांची माहिती घेतली.
दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनेनुसार अशासकीय संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या विशेष अनुदानित उपक्रमांमधील वाढीव विद्यार्थी संख्येला अनुदान तत्त्वावर मान्यता देण्याबरोबरच सध्या ५० टक्के वेतन अनुदान मिळणाऱ्या उपक्रमांना १०० टक्के वेतन अनुदान देण्याबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी संबंधित संस्थांची प्रत्यक्ष तपासणी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
याच अनुषंगाने शुक्रवारी (दि. ५) मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी वाई तालुक्यातील पाचवड येथील सह्याद्री शिक्षण संस्था संचलित आपुलकी निवासी मतिमंद मुलांची शाळा आणि जावळी तालुक्यातील कुडाळ येथील सांजवात शिक्षण संस्था संचलित मनमंदिर मतिमंद मुलांचे कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राला भेट दिली.
पाचवड येथील पाहणीदरम्यान शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या, त्यांना दिले जाणारे शिक्षण, उपलब्ध सुविधा तसेच विविध उपक्रमांची माहिती घेण्यात आली. नागराजन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबतही जाणून घेतले. त्यानंतर कुडाळ येथील कौशल्य विकास व उद्योजकता केंद्राच्या कामकाजाची पाहणी करून तेथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण उपक्रमांची माहिती घेण्यात आली.
या पाहणीच्या आधारे संबंधित संस्थांच्या प्रस्तावांची वस्तुनिष्ठ पडताळणी करून अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर वाढीव विद्यार्थी संख्येला अनुदानाची मान्यता तसेच वेतन अनुदानात वाढ करण्याबाबतचा निर्णय शासनस्तरावर होणार आहे. या वेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी विद्यानंद चल्लावार आणि वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता ललिता शेळके उपस्थित होते.
वाढीव विद्यार्थी संख्या, वेतन अनुदानाचा प्रस्ताव; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडून दिव्यांग संस्थांची तपासणी
by Team Satara Today | published on : 07 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा