कर्ज न घेताही कर्जदार दाखविल्याचा गंभीर आरोप; महाराजा मल्टीस्टेट सोसायटी कारभाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी साताऱ्यात उपोषण

by Team Satara Today | published on : 07 September 2026


सातारा : कर्ज न घेताही कर्जदार दाखविल्याचा गंभीर आरोप करत फलटण येथील महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील नागरिकांनी या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून, संस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराची तपासणी करण्याची मागणी केली आहे.
यासंदर्भात मधुकर जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील नागरिकांनी कष्टाने जमा केलेली रक्कम महाराजा मल्टीस्टेटमध्ये ठेवली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, काही शेतकऱ्यांच्या कथित बनावट सह्यांचा वापर करून त्यांच्या नावावर कर्ज दाखविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे संबंधित शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात कर्ज घेतले नसतानाही त्यांच्याकडून कर्जाची वसुली केली जात असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले असून मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर संस्थेच्या आर्थिक व्यवहारांसह कर्जप्रकरणांची सक्षम आणि स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. चौकशीत दोष आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच कथितरीत्या चुकीच्या पद्धतीने कर्जदार दाखविलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबतचे निवेदन सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांनाही देण्यात आले आहे. त्यामुळे सहकारी संस्थेच्या कारभाराबाबत करण्यात आलेल्या आरोपांची प्रशासन व पोलिसांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद; राजवाडा, मोती चौक, राधिका रोड परिसरात बाजारपेठा सुरू
पुढील बातमी
वाढीव विद्यार्थी संख्या, वेतन अनुदानाचा प्रस्ताव; मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडून दिव्यांग संस्थांची तपासणी

संबंधित बातम्या