धावण्याच्या शर्यतीत हृदय थांबले; डॉक्टरांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतरही पुण्याच्या धावपटूचा मृत्यू, मॅरेथॉनवर शोककळा

by Team Satara Today | published on : 06 September 2026


सातारा : सातारा हाफ मॅरेथॉनमध्ये उत्साहाने धावत आलेल्या पुण्याच्या संजय कदम यांच्या आयुष्याची शर्यत मात्र रविवारी बोगदा परिसरातच थांबली. धावताना अचानक हृदयविकाराचा त्रास जाणवल्यानंतर त्यांच्यावर घटनास्थळी उपस्थित डॉक्टरांनी तातडीने सीपीआरसह प्राथमिक उपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून प्लस हॉस्पिटलमध्ये दाखल करून अँजिओप्लास्टी करण्यात आली; मात्र उपचार सुरू असतानाच काही तासांनी त्यांचा मृत्यू झाला.
सातारा हाफ मॅरेथॉनचे यंदाचे पंधरावे वर्ष आहे. स्पर्धेदरम्यान प्रथमच धावपटूचा मृत्यू झाल्याने आयोजक, सहभागी धावपटू आणि सातारेकरांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.कदम यांना बोगदा परिसरात त्रास जाणवताच त्यांच्या मागून धावत असलेले डॉ. मुजावर, प्लस हॉस्पिटलचे डॉ. कौशिक पाटील आणि मीनाक्षी हॉस्पिटलचे डॉ. प्रतापराव गोळे यांनी धाव घेतली. रुग्णवाहिका येईपर्यंत सीपीआर देत त्यांनी त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहिकेतही उपचार सुरू ठेवण्यात आले.
प्लस हॉस्पिटलमध्ये तपासणीत रक्तवाहिनी ब्लॉक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तातडीने अँजिओप्लास्टी करण्यात आली. डॉ. संग्राम देशमुख, डॉ. ओंकार पाटील यांच्यासह वैद्यकीय कर्मचाऱ्यांनीही उपचारासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काही तासांनी कदम यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने आनंदाच्या मॅरेथॉनवर शोककळा पसरली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संस्कृती परंपरा टिकाव्यात यासाठी विश्वरूपिणी ग्रुपने शेकडो महिलांना दिले मंगळागौरीच्या खेळाचे मोफत प्रशिक्षण
पुढील बातमी
यवतेश्वरच्या घाटात दमछाक; परतीच्या वेगात प्रवीण कांबळे सरस! महिलांमध्ये राणी उत्तंडेची बाजी; २१ किलोमीटरच्या शर्यतीत सांगलीच्या धावपटूंचा दबदबा

संबंधित बातम्या