बामणोली : कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावर आहीर-तापोळा दरम्यान उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक केबल स्टे ब्रिजचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणारा हा पूल गणेशोत्सवाच्या काळात छोट्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला होणार आहे. यामुळे चाळीस किलोमीटरचे अंतर वाचणार आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा पूल खुला करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य अजित सपकाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजयराव मोरे व विजय शिंदे यांनी संबंधित विभागांकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे १०५ गावांतील नागरिकांसह मुंबईस्थित चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या पुलामुळे सोळशी आणि कांदाटी खोरे थेट जोडले जाणार असून, अनेक वर्षांपासून भेडसावणाऱ्या वाहतूक व दळणवळणाच्या समस्येला पूर्णविराम मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या पुलाचे काम करण्यात येत आहे. सुमारे १७५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणारा हा पूल वाहतुकीसाठीच नव्हे तर पर्यटनाच्या दृष्टीनेही मोठे आकर्षण ठरणार आहे.
सुमारे ५४० मीटर लांबी आणि १४.१५ मीटर रुंदी असलेल्या या केबल स्टे ब्रिजवर ४३ मीटर उंचीची प्रेक्षागॅलरी उभारण्यात आली आहे. या ठिकाणाहून कोयना जलाशयाचे विस्तीर्ण बॅकवॉटर, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि सूर्यास्ताचे विहंगम दृश्य पर्यटकांना अनुभवता येणार आहे. त्यामुळे कोकण पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा पूल भविष्यात पर्यटनाचे महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे. दरम्यान हा पूल गणेशोत्सव काळापुरता वाहतुकीसाठी खुला न करता कायमस्वरूपी वाहतुकीसाठी खुला करण्याची मागणी होत आहे.
आहीर-तापोळा केबल स्टे ब्रिज गणेशोत्सवाच्या काळात छोट्या वाहनांसाठी खुला होणार; चाळीस किलोमीटरचे अंतर वाचणार
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा