फलटण : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील विडणी (ता. फलटण) येथील गाडे-पवारवस्ती परिसरात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात महाविद्यालयीन युवतीचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील तिची लहान बहीण व आजी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सिद्धी दशरथ पवार (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास सिद्धी पवार ही आपली लहान बहीण रिद्दी व आजी कौसल्याबाई यांच्यासह इलेक्ट्रिक स्कुटीवरून विडणीच्या दिशेने जात होती. गाडे-पवारवस्ती परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या कडेला असलेल्या डिवायडरला स्कुटीची जोरदार धडक बसली. त्यानंतर गाडी घासत पुढे सुमारे २० फूट अंतरावर असलेल्या विद्युत खांबावर आदळली.
या अपघातात सिद्धीच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. तिचा जागीच मृत्यू झाला. स्कुटीवर पाठीमागे बसलेल्या रिद्दी व कौसल्याबाई या दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर फलटण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिद्धी पवार ही अत्यंत मेहनती व अभ्यासू विद्यार्थिनी होती. ती फलटण येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी महाविद्यालयात जाताना तिने लहान बहीण व आजीला विडणी गावात सोडून पुढे फलटणकडे जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, महाविद्यालय गाठण्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला.
विडणी येथे भीषण अपघातात महाविद्यालयीन युवतीचा जागीच मृत्यू; स्कुटीची डिवायडरला धडक, लहान बहीण व आजी गंभीर जखमी
by Team Satara Today | published on : 05 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा