शाहू स्टेडियमबाहेर कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला; अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

by Team Satara Today | published on : 05 September 2026


सातारा : येथील शाहू स्टेडियमबाहेर नाश्ता करत बसलेल्या कृषी विभागातील कर्मचाऱ्यावर एका अल्पवयीन संशयिताने धारदार चाकूने अचानक प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात संगम नारायण घोळसे (वय ३०, मूळ रा. जत्तेवाडी, ता. चंदगड, जि. कोल्हापूर; सध्या रा. सातारा) हे गंभीर जखमी झाले असून, भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
​जखमी संगम घोळसे हे सातारा येथील कृषी विभागात स्टेनोग्राफर पदावर कार्यरत असून दोन महिन्यांपूर्वीच ते रुजू झाले आहेत. नेहमीप्रमाणे सकाळी ते शाहू स्टेडियम परिसरातील एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले होते. घोळसे बेसावध असताना अचानक आलेल्या संशयित अल्पवयीन मुलाने त्यांच्यावर चाकूने वार केले. हल्ल्यानंतर धारदार चाकू घटनास्थळीच टाकून पळ काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या या अल्पवयीन हल्लेखोराला परिसरातील सतर्क नागरिकांनी तात्काळ पकडून रोखून धरले. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या घोळसे यांना नागरिकांच्या मदतीने तातडीने उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
​घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन संशयिताला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत जखमी कर्मचारी आणि हल्लेखोर हे एकमेकांच्या अजिबात ओळखीचे नसल्याचे आणि त्यांच्यात कोणताही पूर्ववाद नसल्याचे समोर आले आहे. संशयित अल्पवयीन असल्याने आणि तो तपासात सहकार्य करत नसल्याने हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. खेळाडू, महिला व नागरिकांची सातत्याने वर्दळ असणाऱ्या शाहू स्टेडियम परिसरात हा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून शाहूपुरी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्कॉच व्हिस्कीच्या दरात घसरण; आयात शुल्क कपातीमुळे मद्यप्रेमींना दिलासा
पुढील बातमी
विडणी येथे इलेक्ट्रिक स्कूटर दुभाजकावर आदळून तरुणी ठार; बहीण व आजी गंभीर जखमी

संबंधित बातम्या