ध्वनी प्रदूषणाची तक्रार आल्यास नियमानुसार कारवाई : एसपी निखील पिंगळे

by Team Satara Today | published on : 05 September 2026


सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलिस आणि गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक शुक्रवारी सायंकाळी अलंकार हॉलमध्ये पार पडली. या वेळी गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचे काटेकोर पालन करून साजरा करण्याचे आवाहन करत, आवाजाच्या मर्यादेबाबत नागरिकांची तक्रार आल्यास शहानिशा करून थेट कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांनी दिला.

या बैठकीत बोलताना पोलिस अधीक्षक पिंगळे म्हणाले की, सर्व गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करत पोलिसांना सहकार्य करावे. मिरवणुकीदरम्यान कोणतेही आक्षेपार्ह कृत्य करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच मिरवणूक मार्गावर आणि हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. उत्सवासाठी वर्गणी मागताना नागरिकांवर कोणत्याही स्वरूपाचा दबाव आणू नये, अशा कडक सूचनाही त्यांनी मंडळांना दिल्या. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि लहान मुलांना त्रास होणार नाही याची दक्षता घेत सर्वांनी उत्सवाचे पावित्र्य राखावे, असे आवाहनही त्यांनी केले.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी मंडळांनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततापूर्ण वातावरणात उत्सव साजरा करावा, अशा सूचना दिल्या. या बैठकीला पोलिस अधिकारी विपुल पाटील, पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत यादव, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राजेश माने यांच्यासह विविध आजी-माजी नगरसेवक, सातारा शहर गणेशोत्सव समितीचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे आभार सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिजीत यादव यांनी मानले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर साताऱ्यात विद्यार्थी संघटनांचे आंदोलन तीव्र; प्रमुख मागण्यांवर ठाम
पुढील बातमी
स्कॉच व्हिस्कीच्या दरात घसरण; आयात शुल्क कपातीमुळे मद्यप्रेमींना दिलासा

संबंधित बातम्या